कराड शहर पोलिसांनी पाटण तालुक्यातील नारळवाडी येथून सुमारे  १० लाख रूपये किमतीची चोरीची कीटकनाशके जप्त करून दोघांना गजाआड केले. जप्त करण्यात आलेली कीटकनाशके बायोक्लेम प्रकारची असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.
खब-याकडून दत्त चौकात चोरीच्या कीटकनाशकांची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पाटील यांच्या सूचनेनुसार फौजदार अविनाश वणवे यांनी पोलीस सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकासह दत्त चौकातील शिवसृष्टी संकुल इमारतीत असणा-या ओम एजन्सीसमोर दोघे जण हातात बॉक्स घेऊन संशयास्पद स्थितीत उभे दिसले. याबाबत पोलिसांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर पोलिसांनी बॉक्स उघडून पाहिले असता दोन्ही बॉक्समध्ये बायोक्लेम नावाचे ९ लाख ६० हजार ४२० रूपये किंमतीचे कीटकनाशकांचे एकूण ५५ डबे आढळून आले. त्या दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अनिल मारूती खरात (वय ३२, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) आणि कृष्णत गोपाळ चव्हाण (वय ३८, रा. नारळवाडी, मल्हारपेठ, ता. पाटण) अशी सांगितली.
त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार ११ एप्रिल रोजी प्रशांत कोकरे (राजाचे कुर्ले, ता. खटाव) याने त्या दोघांकडे बायोक्लेम कीटकनाशकांचे एकूण ३५ बॉक्स विक्रीसाठी दिले होते. अटक करण्यात आलेल्यापैकी कृष्णत चव्हाण याला सोबत घेऊन नारळवाडी, मल्हारपेठ येथे लपवण्यात आलेली बायोक्लेमचे आणखी काही बॉक्स पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणाचा अधिक तापस फौजदार अविनाश वणवे करीत आहेत.