प्राण्यांमधील प्रेमळपणाचे दर्शन आपल्याला अनेकदा घडत असते. आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे असणाऱ्या प्राण्यांनाही भावना असतात याचे दर्शन नुकतेच घडले. सांगलीतील शेडगेवाडी येथील एका गावात पाळीव कुत्रा आणि त्याच्या आजारी मालकाचे प्रेम पाहायला मिळाले. दोन दिवसांपासून एक रुग्ण काही कारणाने रुग्णालयात दाखल होता. त्याच दरम्यान एक गावठी कुत्राही या रुग्णालयाच्या व्हरांड्यात फिरत होता. रुग्णालयाचे कर्मचारी आणि डॉक्टर यांनी या कुत्र्याला वारंवार हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो जाण्यास तयार नव्हता. बराच शोध घेतल्यानंतर हा कुत्रा येथील एका रुग्णाचा असल्याचे समजले. आपला मालक बऱ्याच दिवसांपासून घरात दिसत नसल्याने हा कुत्रा रुग्णालयापाशी येऊन बसला होता.

या रुग्णालयातील डॉक्टर दिनकर झाडे याबाबत म्हणाले, दोन दिवसांपासून हे कुत्रे रुग्णालयाच्या दारात बसले होते, मात्र ते कोणाचे आहे हे माहित नसल्याने आम्ही त्यांला हुसकावून लावत होतो. आज सकाळी मी सात वाजताच रुग्णालयात आलो तेव्हा ते दवाखान्याच्या चौकटीतून आत डोकावून पहात आहे. मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण तो जायला तयार नाही. शेवटी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने मी बाहेर येऊन बघितले तर हा कुत्रा व्हरांड्यात चेहरा पाडून बसला होता. माझी चाहूल लागताच तो उठून उभा राहिला. यावेळी मात्र मी त्याला हुसकावून न लावता त्याच्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले. मग त्याला आत येण्यापासून रोखायचे नाही असे मी ठरविले आणि बाजूला झालो.

हा कुत्रा दार ढकलून पटकन आत शिरला आणि हळूच एका खोलीत शिरला. रुग्णाच्या जवळ जाऊन तो विशिष्ट आवाज काढायला लागला. रुग्णानेही त्याच्या डोक्यावर कुरवाळले आणि थोडेसे थोपटले. मग हा कुत्रा तितक्याच हळुवारपणे बाहेर आला आणि व्हरांड्यात एका बाजूला जाऊन बसला. आपण घरात दिसत नसल्याने हा कुत्रा घरातील लोक कुठे जातायत यावर लक्ष ठेवून दवाखान्यांपर्यंत पोहोचला असे या मालकाने सांगितले. माणसातील माणुसकी घटत चालली असताना एका मुक्या प्राण्याचे मालकावर असणारे प्रेम अशा पद्धतीने व्यक्त होणे ही खऱ्या अर्थाने हेलावून टाकणारी गोष्ट आहे.