पोलिसांच्या मारहाणीत जळगाव येथील अशोक लोंढे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मृताची पत्नी अंजनाबाई अशोक लोंढे यांनी औरंगाबाद खंडपीठात मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी व्हावी व पाच लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासाठी फौजदारी याचिका दाखल केली होती.

जळगावातील जिल्हापेठ पोलिसांनी २९ ऑगस्ट २००१ रोजी कोठडीत पतीचा खून केला, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. लोंढे यांच्या खुनानंतर स्थानिक वृत्तपत्रांनी प्रकरण उचलून धरले होते. तसेच प्रकरणाची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीही केली होती.

२००५ साली राज्य मानव अधिकार आयोगाकडे याचिकाकर्तीने दाद मागितली होती. पोलिसांनी निर्दयीपणे केलेल्या मारहाणीमुळेच कोठडीत पतीचा मृत्यू झाल्याचे म्हणणे मांडले.

अशोक लोंढे यांना एका प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले नाही, अटक करण्यात आली नाही. चौकशीनंतर ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले व सकाळी हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्त मंदिराजवळ मृतावस्थेत आढळल्याची बाजू सहाय्यक सरकारी अभियोक्त्याने मांडली. तसेच हृदयक्रिया बंद पडल्याने लोंढे यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याचे म्हणणे मांडले.