पर्यावरणाच्या मुद्दय़ावरून स्थानिक एकवटले; १५ हजार एकर जमीन संपादित करणार

राजापूर तालुक्यातील कुंभवडे- वावुळवाडी परिसरात पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पर्यावरणाच्या मुद्दय़ावरून स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांच्या संयुक्त गुंतवणुकीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यालगत एकूण सुमारे १५ हजार एकर जमिनीची गरज असून त्या दृष्टीने राजापूर तालुक्यातील विजयदुर्ग खाडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील कुंभवडे- वावुळवाडी येथे १४ हजार एकर व शेजारीच दुसऱ्या भागात आणखी एक हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी उपलब्ध असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला, तरी आपल्या मालकीची जमीन या प्रकल्पासाठी संपादित होण्याच्या शक्यतेने येथील ग्रामस्थ धास्तावले असून प्रकल्पाच्या विरोधात मोहीम सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

पश्चिम घाट अभ्यास समिती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालांचा एकत्रित विचार करून पर्यावरण खात्याने सह्यद्रीच्या डोंगररांगांमधील अनेक गावे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील (इकोसेन्सिटिव्ह) म्हणून घोषित केली आहेत. या गावांच्या यादीत कुंभवडेही आहे असे निदर्शनास आणून देत, अशा गावाच्या परिसरात पेट्रोकेमिकल प्रकल्प कसा उभा केला जाऊ शकतो, असा सवाल कुंभवडेचे सरपंच पंढरीनाथ मयेकर यांनी उपस्थित केला आहे.

संभ्रमाचे वातावरण

वावुळवाडी या नावाची दोन ठिकाणे राजापूर तालुक्यात असून त्यापैकी कोणत्या ठिकाणाचा नियोजित पेट्रो प्रकल्पासाठी विचार चालू आहे, याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे. काही माध्यमांमधून संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचा तपशील देण्यात आला आहे. पण शासकीय पातळीवरून त्याच्या संपादनाबाबत दुजोरा मिळू शकला नाही. हा तपशील स्पष्ट होईपर्यंत शांत राहण्याचे धोरण ग्रामस्थांनी स्वीकारले असून शासकीय पातळीवरून अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.