सीमेवरील पेट्रोलपंप चालकांचा व्यवसाय मंदावला

इंधनदरवाढीचा भडका वाढू लागल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तर वाहतूक व्यवसाय करणारेही अडचणीत सापडले आहेत. राज्यात सर्वत्र अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या सीमेवरील कर्नाटक राज्यात मात्र पेट्रोल आठ रुपये, तर डिझेल दोन रुपये १५ पशांनी स्वस्त आहे. त्यामुळे सीमेवरील वाहनधारकांसह वाहतूक व्यावसायिक कर्नाटक राज्यातच टाक्या फुल्ल करीत आहेत. परिणामी सीमेवरील पेट्रोलपंप चालकांचा व्यवसाय  मंदावला आहे.

उमरगा तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने १५ किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंप आहेत. तेथे पेट्रोलचा दर ७७ रुपये ९० पसे आहे, तर उमरगा तालुक्यात एका लिटरसाठी ८५ रुपये ४० पसे मोजावे लागतात. कामानिमित्त कर्नाटकात गेलेले दुचाकी चालक आठ रुपयाने प्रतिलिटर दर कमी असल्याने पेट्रोल भरून येतात.

दरकपातीसाठी प्रयत्न -फडणवीस

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले असून ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काम सुरू केले आहे. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास ते दर मोठय़ा प्रमाणात कमी होतील. महाराष्ट्राने त्यासाठी मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.

कर कमी करा – निरुपम

मुंबई:  पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या अनावश्यक करामुळेच किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे हे कर कमी करण्याची मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. इंधन दरवाढीला विरोध आणि कर कमी करावा यासाठी  कॉंग्रेसतर्फे कलिना हायवे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.