कर कमी करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा

अकोला : पेट्रोल-डिझेलवर देशातून सर्वाधिक कर महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने लावले आहेत. राज्य सरकारने तो कर कमी करावा, अन्यथा सरकारच्या विरोधात भाजप जनआंदोलन उभारेल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.

गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये महाराष्ट्रपेक्षा पेट्रोल- डिझेल दर कमी आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर सुमारे ४० ते ४५ रुपये कर लावण्यात आला आहे. राज्य सरकारने इंधनावरील कर दहा रुपये कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी केली. इंधनाच्या दरवाढीवर आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते पुढाकार घेत ठाकरे सरकारवर दबाव आणून नागरिकांना दिलासा देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले होते. त्याच धर्तीवर हे सरकार इंधनाचे दर कमी करण्यासाठी निर्णय घेतील का? असा सवालही आ. सावरकर यांनी केला. केंद्र सरकारपेक्षा दीडपट कर महाराष्ट्र सरकार वसूल करीत आहे. ही सर्वसामान्यांची लूट आहे. याचीही माहिती काँग्रेस नेत्यांनी सर्वसामान्यांना द्यावी व नंतर आंदोलन करावे, असा टोलाही आ. सावरकर यांनी लगावला आहे.