युपीए सरकारच्या काळात एक रुपयांनी पेट्रोल- डिझेल महाग झाले तर तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

मोदी सरकारच्या काळात पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढ भरमसाठ झाली आहे. केंद्रसरकारने पेट्रोलवर एक्साईज ड्युटी दिडशे टक्क्यांनी वाढवली आहे. मात्र युपीए सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक असतानादेखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कुशल आर्थिक धोरणामुळे पेट्रोल डिझेल व गॅसची किंमत कमी ठेवली होती अशी आठवणही महेश तपासे यांनी भाजपाला करुन दिली आहे.

हेही वाचा -विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; २५ रुपयांनी महागला सिलेंडर

महाराष्ट्रात आता गॅसवर सबसिडी मिळणं बंद झालं आहे. पेट्रोल डिझेलने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास सहा महिन्यात १९० रुपयांची दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. भाजपने स्वतःची नैतिकता विसरुन भांडवलशाहीचे राजकारण देशात सुरू केले आहे असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

अनेक दिवस अपरिवर्तित राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३-१५ पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलीटर किंमत आता १०१.३४ रुपये आणि मुंबईत १०७.३९ रुपये प्रतिलीटरआहे. दिल्लीत डिझेलची किंमत आता ८८.७७ रुपये आणि मुंबईत ९६.३३ रुपये प्रतिलीटर आहे. तर विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या. ताज्या दरवाढीनंतर, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० प्रतिलीटर असेल.

१९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही प्रति सिलेंडर 75 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर आता ८८४.५ रुपये आहे, पूर्वी तो ८५९.५० रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला आजपासून ९००.५० रुपये भरावे लागतील, कालपर्यंत ७५५.५० रुपये भरावे लागत होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी तुम्हाला ८९७.५ रुपये भरावे लागतील.