राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं एक जुनं ट्विट सध्या चर्चेत आहे. खुद्द रोहित पवार यांनी आपल्या जुन्या ट्विटची आठवण करून देत नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी पेट्रोल डिझेल वाढीसंदर्भात काही दिवसांपूर्वी ट्विट करून एक भाकित केलं होतं. ते अखेर खरं ठरलं आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. काही रविवारी सर्वच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत एक भीती व्यक्त केली होती. पेट्रोल डिझलचे दर वाढण्याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं. ते खरं ठरलं आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत त्याची आठवण करून दिली.

रोहित पवारांनी एक ट्विट केलं. “जी भिती होती, ती अखेर खरी ठरली!” असं म्हणत त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरावर म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जुनं ट्विटही त्यांनी रिट्विट केलं आहे.

जुन्या ट्विटमध्ये रोहित पवार काय म्हणाले होते?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी हे ट्विट केलं होतं. “चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की, काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय!,” असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

rohit pawar on petrol diesel price hike

 

आणखी वाचा- ७० दिवसांच्या विश्रांतीनंतर देशात इंधनदरवाढ ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली?

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या काळात पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. मागील सलग १८ दिवस पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर होते. मात्र, दोन तारखेला लागलेल्या निवडणूक निकालांनंतर पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीला पुन्हा प्रारंभ झाला आहे. १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर इंधनाच्या दरांमध्ये मंगळवारी वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात १२ ते १५ पैसे प्रति लिटर, तर डिझेलचे दर १५ ते १८ पैसे प्रती लिटरने वाढवण्यात आले आहेत.