महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच आणि डिझेल प्रतिलिटर अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. नवे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून पेट्रोलचे  दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलमध्ये अडीच रुपयांची कपात केली असून, डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे डिझेल प्रतिलिटर फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत अडीच रुपयांची कपात केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.

केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं होतं. त्याला महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद दिला असून नवे दर तात्काळ लागू करत असल्याची घोषणा केली आहे.

याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील एक्साइज ड्युटी केंद्र सरकारकडून १ रुपया ५० पैसे कमी करण्यात आली आहे, तर ओएमसी अर्थात तेल कंपन्यांकडून १ रुपया कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रतिलिटर अडीच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती दिली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करतो आहोत असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी. म्हणजेच पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारांनी कमी आकारावा म्हणजे ग्राहकांना प्रतिलिटरमागे पाच रुपयांचा दिलासा त्वरित मिळेल. यासंदर्भात आम्ही देशातील सगळ्या राज्यांशी चर्चा करणार आहोत त्यांनी त्वरित यासंदर्भात घोषणा करावी असे आवाहन आम्ही करणार आहोत. जेणेकरून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची सूट मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.