संगमनेरच्या सांस्कृतिक व कलाविश्वात अग्रेसर राहून काम करणारे येथील पत्रकार संतोष खेडलेकर यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त झाली आहे. ‘मराठी भाषिक वर्तमानपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांची उपयुक्तता’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.
खेडलेकर यांना या प्रबंधासाठी ज्येष्ठ पत्रकार अरिवद गोखले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी ‘लोकसत्ता’सह जिल्हय़ातल्या इतर तीन वृत्तपत्रांची निवड केली होती. वर्तमानपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांच्या संबंधाने हे पहिलेच संशोधन आहे. विविध वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्या सुरू झाल्यानंतर कोणते सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडले याचा परामर्श घेताना खेडलेकर यांनी संबंधित वृत्तपत्रांचे आवृत्तीप्रमुख, पत्रकार, वितरक यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींपासून सामान्य वाचकापर्यंत सर्वाची मते जाणून अभ्यासली होती. खेडलेकर यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ आदींनी अभिनंदन केले आहे.