19 January 2018

News Flash

‘सीआयडी’ चे बोधचिन्ह बनविण्यात छायाचित्रकारांचे मोलाचे योगदान!

पुण्यात स्थापन झालेल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला शंभर वर्षे उलटून गेली तरी स्वत:चे बोधचिन्ह व वाक्य नव्हते. आतापर्यंत येणाऱ्या अधिकारी किंवा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला

प्रतिनिधी , पुणे | Updated: November 29, 2012 5:25 AM

पुण्यात स्थापन झालेल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला शंभर वर्षे उलटून गेली तरी स्वत:चे बोधचिन्ह व वाक्य नव्हते. आतापर्यंत येणाऱ्या अधिकारी किंवा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला राज्यातील इतर विभागाप्रमाणे आपल्याही विभागाचे बोधचिन्ह व वाक्य असावे असे कधी वाटले नाही.. पण अखेर याच विभागात गेल्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या छायाचित्रकारांना आपल्या विभागाचे असे बोधचिन्ह असावे असे वाटले.  त्यांच्या धडपडीने वरिष्ठांच्या मागदर्शनाने अखेर शंभर वर्षांनंतर सीआयडीला बोधचिन्ह व बोधवाक्य मिळाले.
सीआयडीमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे रमेश सातकर व समीर शेख यांनी  हे बोधचिन्ह बनविले आहे. तर रविवार पेठेत राहणारे विद्युत अभियंता विशाल रावल यांनी बोधवाक्य बनविले आहे. ‘दोषान्वेषन: सत्यगवशेनार्थ’ असे बोधवाक्य असून त्याचे प्रकाशन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अवघड गुन्ह्य़ाचा तपास करण्यासाठी १९०५ साली पुण्यात सीआयडीची स्थापना करण्यात आली. सीआयडीचे कार्यालय पूर्वी संगम ब्रिज येथे होते. मात्र, सीआयडीच्या कामाचा व्याप वाढल्यानंतर सीआयडीसाठी गणेशखिंड जवळील चव्हाणनगर येथे एक स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. संगम ब्रिज येथून सीआयडीचे मुख्यालय या ठिकाणी हलवण्यात आले. राज्यातील दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग यांना स्वतंत्र असे बोधचिन्ह व बोधवाक्य होते, पण शंभरपेक्षा जास्त वर्षे उलटली तरी सीआयडीला स्वत:चे असे बोधचिन्ह नव्हते.  सीआयडीत छायाचित्रकार म्हणून कार्यरत असणारे सातकर यांना आपल्या विभागाचे बोधचिन्ह असावे, अशी कल्पना सुचली. त्यांनी तत्काळ सीआयडीचे प्रमुख व अपर पोलीस महासंचालक एस. पी. यादव यांना ती सांगितली. त्यांनी ही कल्पना राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या समोर मांडली. त्यांनीही तत्काळ ती मान्य करत राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक जावेद अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली हे बोधचिन्ह बनविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सातकर व शेख यांनी ‘कोरल’ या सॉफ्टवेअरमध्ये हे बोधचिन्ह तयार केले. ते जावेद अहमद यांना पाठविली. त्यांनी त्यातील एक बोधचिन्ह निवडून त्यात काही दुरुस्त सुचविल्या. या दुरुस्त्य करून सीआयडीचे बोधचिन्ह तयार केले.      

First Published on November 29, 2012 5:25 am

Web Title: photographers contribution is very well to make cid logo
टॅग Cid,Photographers
  1. No Comments.