एकीकडे जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसमुळे सर्वांचा जीव टांगणीला लागलेला असताना, दुसरीकडे परिस्थितीचे गांभिर्य लक्षात न घेता केवळ प्रसिध्दीसाठी फवारणी सुरू असताना रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोसेशन करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांविरोधात जनतेमधुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढ्या संकटाच्या वेळी देखील राजकारण केलं जात असल्याबद्दल जनतेतून आश्चार्य व्यक्त केले जात आहे.

तीन दिवसांपासून वर्धा शहरात नगरपालिकेतर्फे करोनाच्या पार्श्वभूमीवर वार्डावार्डात फवारणी केली जात आहे. निरजंतूकीकरणासाठी पालिकेने तीन फवारणी यंत्र मागविले आहेत. मात्र एकीकडे फवारणीचे काम सुरू असताना दुसरीकडे भाजपाचे नगरसेवक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ‘फोटो सेशन’ आटोपून घेत असल्याचे दिसून येत आहे.

खरंतर हे अत्यंत धोकादायक आहे. शिवाय गर्दी टाळण्याचा संचारबंदीच्या मुख्य हेतूला देखील एकप्रकारे लोकप्रतिनिधींकडूच हरताळच फासल्या जात आहे. भाजपाचे श्रेया देशमुख, गुंजन मिसाळ, वरूण पाठक, गुणवंत ठाकरे, निलेश किटे व अन्य नगरसेवक फवारणीवेळी स्वत:च्या मार्गदर्शनात काम सुरू असल्याचे दर्शवत आहेत. भाजपची सत्ता असणाऱ्या वर्धा पालिकेतील अधिकाऱ्यांनी असे न करण्याबाबत नगरसेवकांना विनंती केल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र नेतेगिरीच्या थाटात नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा हा सल्ला धुडकावत आपले फिरणे सुरूच ठेवल्याचे दिसत आहे.

एक नगरसेवक व त्याच्यासोबत त्याचे चार ते पाच कार्यकर्ते फवारणी यंत्राच्या गाडीपूढे चालत चालत सूचना करताना दिसतात.  हे पाहल्यावर नागरिकांमधून आश्चार्य व्यक्त केले जात आहे. शिवाय, सोशलमीडियाच्या माध्यमातून या कृत्याबाबत टीकेची झोड देखील उठवली जात आहे.

या बाबत बोलताना, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश देव म्हणाले, ही अत्यंत चुकीची बाब आहे. यामूळे जनतेत वाईट संदेश जातो. खरे तर नगरसेवकांनी आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करणे अशावेळी आवश्यक आहे. स्वत:च्या जीवाला जपावे व नागरिकांनाही करोनाबाबतीत मार्गदर्शन करावे. मात्र हे सोडून फोटोसेशन करण्याची बाब निंदनीय आहे.