ज्ञानोबा माउलींच्या ठाकुरबुवा येथील रिंगणसोहळ्यातही पहिल्याच फेरीत स्वाराच्या अश्वाला गाठण्याची पहिल्या रिंगणापासूनची परंपरा देवाच्या अश्वाने कायम ठेवली. त्यामुळे आनंदीत वैष्णवांनी मोठय़ा उत्साहाने वेगवेगळे खेळ सुरू केले. या उत्साहात पावसाने हजेरी लावली. नंदाच्या ओढय़ातील जलोत्सव व टप्पा येथील बंधूभेटीच्या सोहळ्याने वैष्णव सुखावले.
वेळापूरकरांचा निरोप घेऊन सोहळा सकाळी सहाच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. पावणेनऊच्या सुमारास सोहळा ठाकूरबुवा येथे पोहोचला. मानकऱ्यांनी रथातून पालखी उचलून एक प्रदक्षिणा पूर्ण करून ठेवताच मानाच्या पताकाधारकांनी पालखीला कडे केले. चोपदारानी रिंगण लावताच निशाणाधारका पाठोपाठ स्वाराने अश्वावरून एक प्रदक्षिणा पूर्ण केली व देवाचा अश्व सोडताच त्याने काही क्षणातच स्वाराच्या अश्वाला गाठले व दोघांनी बरोबरीने पाच फेऱ्या पूर्ण केल्या. माउली माउली करून वारकरी या अश्वांना प्रोत्साहन देत होते. रिंगण पूर्ण होताच टापाखालील माती कपाळाला लावून वैष्णवांनी खेळ सुरू केले. मानवी मनोरे, फुगडय़ा, आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची महती सांगणारी गीते व नृत्ये ३ ते ४ स्तरीय मनोऱ्यावर तसेच खांद्यावर घेऊन पखवाजवादन होत होते. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, धोतर टोपी परिधान केलेल्या वैष्णवांनी उडी खेळाचा फेर धरला होता. तेवढय़ात पावसाची रिपरिप सुरू झाली. वारकऱ्यांनी पिशवीतील प्लॅस्टीकचे कागद काढून जागेवरच थांबणे पसंत केले व साडेदहाच्या सुमारास ठाकूरबुवाची आरती करून सोहळा मार्गस्थ झाला. बोंडले व तोंडले गावाच्या मधून वाहणाऱ्या नंदाच्या ओढय़ाला अनेक वर्षांतून यंदा थोडेफार पाणी असल्याने वारकऱ्यांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून जल्लोत्सव साजरा केला. सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी तोंडलेगावी विसावला. या ठिकाणी रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. पलीकडे उजनी वसाहतीजवळून जाणाऱ्या तुकाराममहाराजांच्या रथास नारळ देण्याघेण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तीनच्या सुमारास सोहळा पुढे मार्गस्थ झाला. परिसरातील भाविकांनी याठिकाणी वारकऱ्यांसाठी मोठय़ा प्रमाणात अन्नदान केले. दसूरच्या पुढे टप्याजवळील ओढय़ात पुलावर थाळवणीवून येणाऱ्या माउलीचे थोरले बंधू सोपानकाका व माउली यांच्या बंधूभेटीचा कार्यक्रम वैष्णवांनी डोळे भरून पाहिला. परस्परांना मानाचा नारळ दिल्यानंतर दोन्ही सोहळे एका पाठोपाठ निघाले. टप्पा या ठिकाणी पंढरपूर तालुक्याची हद्द लागत असल्याने नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच आ. भारत भालके, प्रशांत परिचारकांनी सोहळ्याचे स्वागत केले व सोहळा पुढे मार्गस्थ झाला. कुरोली पाटी, कोळ्याचा मळा आदी ठिकाणी थांबलेल्या भाविकांचा पाहुणचार आदरातिथ्य स्वीकारत सोहळा रात्री भंडीशेगावला मुक्कामासाठी विसावला. या ठिकामी रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शन रांग, वारकऱ्यांचे भजन कीर्तन सुरू होते. उद्या दुपारी बाजीरावाची विहीर या ठिकाणी सोहळ्याचे रिंगण होणार आहे.