मंदार लोहोकरे

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके तीर्थक्षेत्र असलेली पंढरी नगरी आता राज्यातून धावणाऱ्या विविध महामार्गाशी जोडली जात आहे. या एका शहरातून तब्बल चार  राष्ट्रीय महामार्ग जात असून यातील अनेकांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. रस्ते वाहतुकीतील या सुलभतेने विठुरायाच्या दर्शनासाठी धावणाऱ्या हजारो वैष्णवांसोबतच विविध संतांच्या पालख्यांचे मार्ग आता सुखकर होण्यास मदत होणार आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकाराने कोटय़वधी रुपयांचा निधी दिला आहे. याअंतर्गतच गेल्या काही वर्षांत विविध राष्ट्रीय महामार्गाची कामेही सुरु झाली होती. तीर्थक्षेत्र पंढरीमध्ये आषाढी, कार्तिकीसह वर्षांत चार मोठय़ा यात्रा भरतात. यामध्ये आषाढीवेळी तर लाखो वारक ऱ्यांसह राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या या नगरीत दाखल होतात.

दरवर्षी या वाढत्या वारकरी संख्येमुळे पंढरीकडे येणाऱ्या रस्त्यांवर, तिथल्या वाहतुकीवर मोठा ताण येत असतो. यातूनच या शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत त्यांच्या विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. पंढरपूरमधून  सध्या पंढरपूर – सांगोला – कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८), पंढरपूर – सातारा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ई ), अहमदनगर-पंढरपूर- मंगळवेढा- विजापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५१६ ए) आणि देहू-आळंदी-पंढरपूर -मोहोळ (राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५) हे चार राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. यातील पंढरपूर-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच पूर्ण केले आहे. पंढरपूर ते सातारा या महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. या मार्गावरील पंढरपूर तालुक्यातील पूल आणि अन्य काही कामे शिल्लक आहेत. पंढरपूर – सांगोला – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील पंढरपूर ते सांगोला हे काम पूर्ण झाले असून उर्वरित कोल्हापूपर्यंतचे काम सुरू आहे. जुना अकलूज-पंढरपूर या २९ किलोमीटर रस्त्याचे काम सुरु झाले आहे. गेली अनेक वर्ष या रस्त्याचे काम रेंगाळले होते. दरम्यान देहू-आळंदी-पंढरपूर -मोहोळ या राष्ट्रीय महामार्गामधील रेंगाळलेले पंढरपूर ते मोहोळ दरम्यानचे कामही सुरु झाले आहे. या विविध रस्त्यांची कामे करताना भूसंपादनाचे काम जलदगतीने पूर्ण झाल्याने चांगले रस्ते तयार होत आहेत. रस्त्यांच्या या विकासामुळे या तीर्थक्षेत्रीचा प्रवास आता सर्वासाठीच सुलभ होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग असे आहेत

* राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ – पंढरपूर – सांगोला – कोल्हापूर

* राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ई – पंढरपूर- सातारा

* राष्ट्रीय महामार्ग क्र. ५१६ ए – अहमदनगर-पंढरपूर- मंगळवेढा- विजापूर

* राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ – पालखीमार्ग-देहू-आळंदी-पंढरपूर -मोहोळ

आषाढीपूर्वी रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन

पंढरपूरला जोडणाऱ्या विविध महामार्गांवरील रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्या माध्यमातून कामे होत आहेत. आषाढी यात्रेपूर्वी उर्वरित रखडलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

– सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर