मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे ते पिंपळगाव या ६० किलोमीटरच्या टप्प्यासाठी टोलमध्ये तिप्पट वाढ लागू करताना तूर्तास नाशिककरांना वगळले गेले असले तरी मार्गस्थ होणाऱ्या उर्वरित सर्व वाहनधारकांवर हा बोजा पडणार आहे. नाशिक जिल्ह्य़ातील वाहनधारकांना तूर्तास जुन्या दराने टोल द्यावा लागणार आहे. या अनुषंगाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत पिंपळगाव येथील नाका अधिकृत की अनधिकृत, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार दोन टोल नाक्यांमध्ये ४० किलोमीटरपेक्षा कमी अंतर असू नये, असा निकष आहे. परंतु, महामार्गावर पिंपळगाव आणि चांदवड या दोन्ही टोल नाक्यांमध्ये त्यापेक्षा कमी अंतर आहे. या ‘बीओटी’ प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने स्वत:चे निकष बदलल्याचे उघड झाले आहे.
गोंदे ते पिंपळगाव या टप्प्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर टोलमध्ये तिप्पट वाढ करण्यास प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला. त्या अनुषंगाने पीएनजी कंपनीने वाढीव टोल आकारणी करण्याची तयारी सुरू केल्यावर लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय नेत्यांनी हा नाका उध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सर्वपक्षीय नेते व संबंधित यंत्रणांच्या बोलाविलेल्या बैठकीत टोल नाक्याचे ठिकाण अधिकृत की अनधिकृत, यावर बराच खल झाला. ४० किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके असू नयेत, हा केंद्र सरकारचा निकष आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव आणि चांदवड येथे टोलनाके उभारताना त्या निकषांचे पालन झाले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. ही बाब प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली. महामार्गाच्या विस्तारीकरणात या टप्प्याचे काम सर्वात अखेरीस झाले. त्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने निकषात काही बदल करावे लागले, ही बाब संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केली. प्राधिकरणाने निकष न पाळल्याचा आर्थिक भरुदड या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या सर्व वाहनधारकांवर पडणार आहे. टोलवाढीच्या बोज्यातून तुर्तास नाशिक जिल्ह्णाातील वाहनांना वगळण्यात आले.
नाशिककरांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन नाशिक व मालेगावच्या वाहनधारकांना जुन्या दराने टोल भरण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलेला प्रस्ताव तात्पुरत्या स्वरुपात कंपनीने मान्य केला. उर्वरित वाहनधारकांना मात्र नव्या वाढीव दराने हा बोजा सहन करावा लागणार आहे. या प्रकल्पात कंपनी तोटय़ात गेल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. प्रकल्पाची सर्व कामे पूर्णत्वास गेल्यानंतर टोलच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वाधिक टोल
 सध्या लागू झालेल्या टोलमुळे राज्यातील हा सर्वाधिक टोल ठरू शकेल. या टोल नाक्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या मोटार व जीपसाठी आता १४० रुपये (दैनंदिन पास २१५), हलकी व्यावसायिक वाहने २२० (३३०) बस व मालमोटार ४४५ रुपये (६६५), अवजड मालवाहू वाहनांसाठी ६७५ रुपये (१०१५) असा टोल भरावा लागणार आहे.