पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीमधील उदवाहन (लिफ्ट) मधून पडल्याने पालिका शिपाई जखमी झाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या पायाला गंभीर इजा झाल्याने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरद भोंडवे असे या जखमी शिपायाचे नाव आहे. शरद भोंडवे हे नेहमी प्रमाणे आज महानगरपालिकेत आले होते.

तिसऱ्या मजल्यावर उपमहापौर कक्षात शिपाई म्हणून ते काम पाहतात, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास महानगरपालिकेच्या उदवाहन (लिफ्ट)मधून जात असताना अचानक वीज गेली आणि दोन मजल्यांच्यामध्ये उदवाहन(लिफ्ट)अडकली, त्यात भोंडवेसह आणखी एक नागरिक होता.

त्यांनी ताकतीचा वापर करून उदवाहन(लिफ्ट)उघडली. परंतु लिफ्ट मधून बाहेर पडताना भोंडवे हे कंबरेवर पडले यात ते जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांचा पायाला गंभीर इजा झाली असून त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. उदवाहन (लिफ्ट)मध्ये उदवाहक असता तर ही घटना टळू शकली असती,त्यामुळे दोषींवर कारवाई होणार का हे पाहाव लागेल. याबाबत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे यांनी घटनेविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या घटनेची माहिती मिळाली असून,याबाबत चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात असे सांगितले.