४० लाख हेक्टरमधील पिकाचे नुकसान; मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर

विदर्भ आणि मराठवाडय़ातील सुमारे ४० लाख हेक्टरमधील बी.टी. कपाशीचे उभे पीक गुलाबी अळीच्या आक्रमणाने नष्ट झाले असून हे या दशकातील सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. यात शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे किमान दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

थिप्स, मिलिबग, बोंडअळी, गुलाबीअळी यांच्या अनियंत्रित प्रादुर्भावामुळे कपाशीचे पीक धोक्यात येत असल्याबद्दल आपण ऑगस्ट महिन्यात सरकारला चिंता कळवली होती, असे तिवारी यांचे म्हणणे आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील कापूस उत्पादक क्षेत्राचा दौरा केल्यानंतर किशोर तिवारी यांनी यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवला आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि कीटकनाशकचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी अमेरिकेच्या मोन्सॅन्टो कंपनीने बोंडअळीरक्षक म्हणजेच बोलगार्ड बी.टी. कपाशीचे बियाणे १९९१ मध्ये भारतात आणले. या बियाणाच्या वापराला २००४ मध्ये सरसकट परवानगी देण्यात आली. या बियाणांसाठी शेतकऱ्यांनी चारपट किंमत मोजली. सुरुवातीला कीटकनाशकाच्या वापरात घट आली. भारतात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र, २००८ पासून उत्पादनात घट येण्यास सुरुवात झाली. २०११ नंतर या बी.टी. कापसावर थिप्स, मिलिबग, बोंडअळी, गुलाबी अळी यांचा प्रादुर्भाव जाणवत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली.

कृषी मंत्रालय आणि भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पूर्णपणे उदासीन असून हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यास सांगावे, अशी सूचना आपण राज्याच्या कृषी विभागाला केली होती. पण, देशात १३० लाख हेक्टर सोडा, १३० हेक्टरवर पेरण्यासाठी देखील हे बियाणे उपलब्ध नाही, हे किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. बी.टी. बियाणांसाठी मूळ संकरित बियाणाची २०० रुपये प्रतिपॅकेट ही किंमत लागू करावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे.

मागणी काय?

गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, पंजाबात मोठय़ा प्रमाणात गुलाबी अळीच्या आक्रमणामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने गेल्या वर्षीच्या तक्रारीवरून राशी कंपनीच्या बी.टी. बियाण्यांवर बंदी टाकली. यावर्षी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडय़ात मोन्सॅन्टो कंपनीचे बोलगार्ड हे तंत्र अयशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा आणि सरळ वाणाचे हायब्रिड कापसाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

इशारा असूनही उत्पादन..

गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाडय़ात सोयाबिन आणि तूर या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले. पण, शेतमाल बाजारात येताच भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरू शकलेले नाहीत. यंदा कापसाला चांगले भाव मिळतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीकडे कल दाखवला, पण गुलाबी अळीने आक्रमण करून पिकेच उद्ध्वस्त केल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. यंदा बी.टी. कपाशीच्या प्रजातीवर मोठय़ा प्रमाणात गुलाबी अळीचा मारा होणार असल्याचा सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. तरीही बी.टी. कपाशीची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली. परिणामी आता शेतकऱ्यांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.