दुचाकीस्वारांसाठी धोकादायक प्रवास; खड्डे बुजविण्यासाठी तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

वर्दळीच्या वाडा-भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डय़ांनी मोठा आकार धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यात दुचाकी जाऊन आदळत असल्याने अपघात घडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. रस्तेदुरुस्तीचा ठेका वर्षभरापूर्वी ‘जयभारत कंस्ट्रक्शन’ला देण्यात आला आहे. मात्र, ठेकेदार कंपनीने त्यात अनियमितता ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मार्गावरील कंपनीने निम्मे खड्डेही बुजविले असल्याचा आरोप केला जात आहे.

राज्य महामार्गावर काही ठिकाणी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. या खोल खड्डय़ांचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नसल्याने नेहमीच या मार्गावर अपघात घडून दुचाकीस्वार जखमी होत आहेत. गेल्या वर्षभरात दुचाकीस्वारांचे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत, तर  तिघांना जीव गमवावा लागला आहे. ठेकेदाराने सुरुवातीला टाळेबंदी व पावसाचे कारण देत रस्तेदुरुस्तीत दिरंगाई केल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत.

पावसात डांबरीकरण करता येत नाही. त्यामुळे काम थांबविण्यात आले होते; परंतु आता काम सुरू करू.

– अनिल भरसड, प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम