येथील फ्रेझरपुरा परिसरातील खुल्या भूखंडावरील अवैध वाळूसाठा जप्त केल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार सुरेश बगळे यांना वाळू तस्करांनी शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या कारवाईमुळे चिडलेल्या एका वाळू तस्कराने अंगावर डिझेल ओतून घेतले, पण बगळे यांनी त्वरित पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्याने अनर्थ टळला. या प्रकरणात ट्रकचालक अब्दुल रज्जाक आणि ट्रकमालक अब्दुल शफी यांना अटक करण्यात आली आहे.
फ्रेझरपुरा परिसरात जुन्या बायपासवरील पंचवटी मंदिरामागे वाळूचा अवैध साठा करण्यात आला होता. तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा वाळूसाठा दोन दिवसांपूर्वी जप्त केला होता. या वाळूसाठय़ाचा लिलाव केला जाणार होता. मात्र, लिलावापूर्वीच येथून वाळूचा ट्रक भरण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार बगळे यांना मिळाली. तहसीलदारांनी ट्रकचालकाला मज्जाव केला, पण त्याने ट्रकमालक अब्दुल शफी याला माहिती दिली. नदीमने घटनास्थळी जाऊन बगळे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि ट्रकचालक अब्दुल रज्जाक याने त्यांच्या अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रज्जाकने डिझेल ओतून घेतले.