मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाउन नव्हता तर नियोजनबद्ध सायबर हल्ला करण्यात आला होता असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन झाला नव्हता. तर तो सायबर हल्ला होता असा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन होत असतानासर्व्हर मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. या मुद्याकडे लक्ष वेधल्यावर मंत्री सामंत यांनी सांगितले की,’ याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू आणि सायबर विभाग प्रमुख रश्‍मी करंदीकर यांच्याशी चर्चा झाली आहे. कुलगुरूंनी दिलेल्या प्राथमिक अहवालामध्ये सायबर प्रणाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता असे नमूद केले आहे. हा सायबर हल्ला आहे. याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली असून कालपासून त्याची चौकशी सुरू झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा कसलाही गोंधळ नाही. काहीजण मुद्दाम घोळ घालत आहेत. ही ऑनलाईन परीक्षा ९ हजार विद्यार्थी देत होते. मात्र एकाच वेळी अडीच लाख विद्यार्थ्यांकडून त्याची लिंक ओपन केली जात असल्याचे दिसले आहे. याचा अर्थ हि यंत्रणा ठप्प होण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे. तपासातून यातील वस्तुस्थिती पुढे येईल, असेही सामंत यांनी नमूद केले.

महाविद्यालये तूर्त बंद
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय तूर्तास सुरू केली जाणार नाही, असेही सामंत यांनी सांगितले. राज्यात करोनाचा प्रभाव अद्यापही जाणवत आहे. ही स्थिती लक्षात घेता महाविद्यालय सुरू केली जाणार नाहीत. करोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.