शेतक-यासह प्रशासनाला आता येत्या खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. नगर जिल्हा मुख्यत्वे रब्बीचा म्हणून ओळखला जात असला तरी खरीप हंगामासाठी जिल्ह्य़ात तब्बल ६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अडीच लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक रासायनिक खतांची मागणी प्रशासनाने नोंदवली आहे.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी महसूल व कृषी खात्याच्या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी संचालक शिरीष जाधव, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, आत्माचे संचालक शिवाजी आमले आदी या बैठकीला उपस्थित होते.
गेली दोन, तीन वर्षे जिल्हा दुष्काळाचा सामना करीत आहे. गेल्या वर्षी तुलनेने त्याची तीव्रता कमी होती, मात्र मागच्या दोन महिन्यांत जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचे मोटे नुकसान केले. या पार्श्र्वभूमीवर यंदा खरीपाबाबत जिल्ह्य़ातच मोठय़ा आशा आहेत. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, मागच्या दोन, तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता येत्या खरीप हंगामात शेतक-यांना वेळेवर बियाणे व खते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला खते व बियाण्यांची विक्री होणार नाही, तसेच काळा बाजारही होणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता वाटल्यास संबंधितांवर कडक कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खते केव्हा उपलब्ध होतील याचीही माहिती शेतक-यांना वेळेवर दिली पाहिजे असे ते म्हणाले.
जिल्हयातील प्रत्येक महसुली मंडळात पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत अशी माहिती कवडे यांनी दिली. गेल्या वर्षी जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, मात्र यंदा प्राथमिक अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्षे वेधले. अलीकडच्या काही वर्षांतील हवामानातील बदल लक्षात घेता शेतक-यांनी पीकपद्धतीत बदल करण्याची गरज आहे काय, याचाही बारकाईने अभ्यास करून त्यानुसार शेतक-यांना मार्गदर्शन करावे असे आवाहनही त्यांनी केले. त्यासाठी तालुका अथवा जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेणेही गरजेचे आहे असे ते म्हणाले. गारपिटीने शेतक -यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने त्याला मदतही जाहीर केली, मात्र त्यातून शेतक-यांचे पूर्ण नुकसान भरून निघेल अशी स्थिती नाही. मदतीतून शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असतो. तो लक्षात घेऊनच पीक विम्यासाठी शेतक-यांना उद्युक्त करावे असे आवाहनही कवडे यांनी केले. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे ते म्हणाले.
खरीप हंगामाचे नियोजन करताना बाजरी, भात, मका, कडधान्य, तेलबिया, कापूस आदी बियाण्यांची पुरेसा प्रमाणात मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर ६. उपविभाग स्तारावर ८, आणि तालुका स्तरावर २८ असे एकूण ४२ गुणनियंत्रण निरीक्षक नेमण्यातच आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बियाण्यांचे जिल्ह्य़ात १ हजार ८१६, खतांचे १ हजार ८७७ व कीटकनाशकांचे १ हजार ८८१ परवानाधारक वितरक असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. राष्ट्रीय फलोद्यान अभियान, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कोरडवाहू शेती अभियान या योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.