दंडकारण्य अभियानाचा भाग म्हणून वटपौर्णिमेचे औचित्य साधत तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली असून आजच्या उपक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दिली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचे हे नववे वर्ष आहे. राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या अभियानाचे रूपांतर आता लोकचळवळीत झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणाऱ्या या अभियानाच्या प्रसारासाठी तसेच तळेगाव येथे होत असलेल्या गंगागिरी महाराजांच्या १६७ व्या सप्ताहाच्या प्रचारासाठी महिलांनी गटनिहाय फेऱ्या काढल्या होत्या. तांबे यांच्यासह कांचनताई थोरात, शरयू देशमुख, मीरा चकोर, पूनम माळी, आरती दिघे यांच्यासह अनेक महिला उपक्रमात अग्रभागी होत्या.
महिलांच्या या जथ्थ्याने गावोगाव जावून वृक्षारोपण, संवर्धनाची माहिती देताना दंडकारण्य अभियानाचे महत्त्व विशद केले. आजच्या वटपौर्णिमेचे औचित्य साधत वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देण्यात आले. आयुर्वेदामध्ये वड, िपपळ, रूई, उंबर आदी वृक्षांना देववृक्ष संबोधले जाते. प्रत्येक गावात, वस्तीवर वटवृक्ष असावा या भावनेतून अभियान समितीच्या वतीने १ हजार १०० रोपांचे वाटप करण्यात आले. त्या, त्या गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. या उपक्रमास तालुक्यातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.