News Flash

प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम भांडय़ांचा आरोग्यमय पर्यावरणपूरक वापर शक्य

महाराष्ट्रातील संशोधकांचा यशस्वी प्रयोग

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| अनिकेत साठे

महाराष्ट्रातील संशोधकांचा यशस्वी प्रयोग

घरोघरी अन्न पदार्थ तयार करताना अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांचा अधिक्याने वापर केला जातो. अन्नात मिसळणाऱ्या या धातुचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. तशीच स्थिती प्लास्टिक बाटल्यांची. शेकडो वर्ष विघटन न होणाऱ्या बाटल्यांमुळे कचरा वाढतोच. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात त्या हातभार लावतात. अ‍ॅल्युमिनियमची भांडी आणि प्लास्टिक बाटल्यांमुळे घोंघावणाऱ्या आरोग्याच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील संशोधकांनी यशस्वी पावले टाकली आहेत. या दोन्ही घटकांना तांब्याचे आवरण देण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आहे. जेणेकरून अ‍ॅल्युमिनियम भांडय़ाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होईल. तसेच तांब्याचे आवरण असणाऱ्या प्लास्टिक बाटलीचा पुनर्वापर शक्य होईल. पुनर्वापराच्या नाविण्यपूर्ण संशोधनाचे स्वामित्व हक्क अर्थात पेटंट संबंधितांना मिळाले आहे.

प्लास्टिक बाटलीच्या आतील भागात तांब्याचे आवरण देऊन नैसर्गिकपणे पाणी शुध्दीकरणाची संकल्पना संशोधक रवींद्र अमृतकर यांनी मांडली होती. त्यास रेखा पाटील, अंकिता नगरकर या सहाय्यकांचे पाठबळ मिळाले. या तिन्ही संशोधकांनी प्लास्टिक बाटली आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ास आतील भागात तांब्याचा मुलामा देण्याचे प्रयोग केले. ते यशस्वी झाल्यानंतर संबंधितांनी सादर केलेल्या संशोधनाला पेटंट कार्यालयाने मान्यता दिली आहे. या संशोधनाने सध्या भेडसावणारे अनेक प्रश्न सोडविण्याचा मार्ग खुला झाला आहे. वजनाला हलकी, टिकायला चांगली, उष्णतावाहक आणि स्वस्तात मिळणारी अ‍ॅल्युमिनियमची भांडी नसेल असे घर सापडणे अवघड. चहापासून सर्व अन्न पदार्थ तयार करण्यासाठी या भांडय़ाचा सर्वत्र वापर केला जातो. या प्रक्रियेत अ‍ॅल्युमिनियमचे कण विलग होऊन अन्नात मिसळतात. शरीरात प्रवेश करणाऱ्या धातुने अनेक विकार जडतात. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासह आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. या बाटल्यांचा पुनर्वापर पूर्ण क्षमतेने होत नाही. बाटलीमध्ये तांब्याचे आवरण असल्यास ती एकदा वापरून कोणी फेकणार नाही. आरोग्याचा विचार करता तांब्याच्या भांडय़ात पाणी साठवल्यास नैसर्गिकरीत्या पाणी शुध्दीकरणाला चालना मिळते. बाटलीतील पाण्याच्या तापमानात बदल होऊ  नये म्हणूनही योग्य तो बदल करण्यात आला आहे.

फेकलेल्या सर्व बाटल्या या पध्दतीने पुनर्वापरात आणल्या गेल्यास नंतर कोणीही बाटली फेकणार नाही. हे संशोधन आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम रोखण्यास महत्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

महत्वाची बाब म्हणजे, अ‍ॅल्युमिनियमचे आवरण देण्याची ही पध्दत फारशी खर्चिक नाही. ही प्रक्रिया अमलात आणल्याने रोजगाराला चालना मिळेल. तांबा ‘कोटींग’ केंद्र आणि तांबा-प्लास्टिक पुनर्वापर केंद्र अतिशय कमी गुंतवणुकीत शहरी-ग्रामीण भागात उभे करता येतील. मोठय़ा प्रमाणात ही प्रक्रिया केल्यास सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प किंमतीत ते सर्वाना सहजपणे उपलब्ध होईल, याकडे संशोधकांनी लक्ष वेधले आहे.

या संशोधनाकडे सार्वजनिक आरोग्याचा विषय म्हणून आम्ही पहात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून या बाबत आवाहन करावे, यासाठी त्यांना माहिती पाठविण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दत्तक घेतलेल्या गोळवणी या आदर्श गावात पहिला प्रकल्प सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. आयुष मंत्रालयानेही जागतिक आरोग्य संघटनेच्या स्तरावर पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली आहे.   – रवींद्र अमृतकर (संशोधक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 12:57 am

Web Title: plastic ban in maharashtra 15
Next Stories
1 टोल वाचवण्यासाठी बदलला मार्ग; बस दरीत कोसळून ३ ठार, २२ जखमी
2 करवाढ स्थगिती; भाजपची माघार
3 विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीविषयी संभ्रम कायम
Just Now!
X