प्लास्टिक बंदीने हवालदिल उद्योग संघटनांची तक्रार

राज्य शासनाने कोणतीही सूचना न देता किंवा अधिसूचना न काढता प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक उत्पादनांवर धाडी टाकून त्या जप्त करण्याची सुरू केलेली कारवाई दडपशाहीची आणि अन्याय्य आहे. राज्यात सोमवारपासून लागू झालेल्या प्लास्टिक बंदीच्या घोषणेनंतर किरकोळ व्यापारातील तब्बल ५० टक्के खरेदी भीतीपायी थांबली आहे. या उद्योगाच्या मुळावरच हा घाव असल्याचे प्लास्टिक उद्योगात कार्यरत संघटनांनी केली आहे.

महाराष्ट्रात प्लास्टिक उद्योगात साधारण २,१५० उत्पादन प्रकल्प आहेत, तर या क्षेत्रातील थेट नोकऱ्यांचे प्रमाण दोन लाखांच्या घरात आहे. अप्रत्यक्षपणे या क्षेत्रात साधारणत: ४.५ लाख लोक कार्यरत आहेत. राज्याच्या सकल उत्पादनातील या उद्योगाचा वाटा ३५ टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी जश्नानी यांनी दिली.

बंदीमुळे प्लास्टिक उद्योगाला मोठे नुकसान सोसावे लागणारच आहे, बरोबरीनेच प्लास्टिकवर अवलंबून असलेल्या खाद्यान्न, औषधी, वैद्यकीय, वस्त्रोद्योग, किरकोळ विक्री आदी उद्योगही काही प्रमाणात किंवा संपूर्णत: बंद होणार आहेत. या क्षेत्रातील उद्योग परराज्यांत जातील, ज्यामुळे महाराष्ट्राला कर महसुलाला मुकावे लागेल. शिवाय त्यामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे, असा इशारा जश्नानी यांनी दिला.

थर्मोफार्मर्स अँड अलाईड इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष हर्षित मेहता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पुण्यातील काही दुकानांमधून सरकारी यंत्रणांनी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंचा साठा जप्त केला. त्याशिवाय प्लास्टिक आणि थर्माकोल वापरासाठी या दुकानचालकांना दंड ठोठावला गेला. त्यांच्याकडील साठा सील केल्याने हे सर्व व्यापारी सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ताकीद न देताच ही कारवाई करण्यात आल्याने हे सर्व हवालदिल झाले आहेत.

राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सर्व प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादकांना प्लास्टिक उत्पादन सोडून कापडी पिशव्या बनविण्याचे आवाहन केले आहे. सरकारने सर्वसामान्यांना विनामूल्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सरकारकडून झालेली ही घोषणा म्हणजे एका उद्योगाला प्रोत्साहन देत असताना त्याचवेळी दुसऱ्या उद्योगाला दुय्यम वागणूक देण्याचा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्स सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ कामथ यांनी व्यक्त केली.