सोलापूर जिल्ह्य़ात काल बुधवारी बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, गुरूवारीही अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे हवामानात फरक पडून थंडी गायब झाली. तर या बेमोसमी पावसामुळे द्राक्षे, डाळिंबासह ज्वारी,बाजरी आदी पिकांची हानी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असताना काही जागरूक शेतकऱ्यांनी संगणकाचा वापर करून हवामानाचा अचूक अंदाज घेत बेमोसमी पावसापासून पिकांचे रक्षणही केल्याचे पाहावायास मिळाले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील डॉ. सी. व्ही. हविनाळे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात द्राक्ष बाग उभी केली आहे. प्रतिकूल वातावरणात जिवापाड कष्ट करून ही द्राक्षबाग वाढवत असताना डॉ. हविनाळे यांनी संगणकाचा वापर हाती घेतला आहे. त्याचा लाभ त्यांना बेमोसमी पावसापासून द्राक्ष बाग वाचविताना झाला. शेतातील पिकांचे संवर्धन संगणकाच्या मदतीने करीत असताना डॉ. हविनाळे हे बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज घेतात. त्यानुसार काल मंगळवारी बेमोसमी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आला. तेव्हा त्यांनी लगोलग ६२ हजार रुपये खर्च करून प्लास्टिकचे आच्छादन मागविले व ते संपूर्ण द्राक्ष बागेवर घातले. प्लास्टिकचे आच्छादन लावताना आसपासच्या शेतकऱ्यांनी डॉ. हविनाळे यांची चेष्टा केली. परंतु अंदाज वर्तवल्यानुसार काही तासातच बेमोसमी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. परंतु त्यात त्यांची द्राक्ष बाग बचावली.
यासंदर्भात बोलताना डॉ. हविनाळे यांनी, अचानकपणे पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे जिवापाड जपलेले पीक हातोहात वाया जाणे अजिबात परवडणारे नव्हते. म्हणून काळाची पावले ओळखून संगणकाच्या आधारे हवामानाचा अचूक अंदाज घेतला. त्याचे दृश्य परिणाम लगेचच दिसून आले. केवळ बेमोसमी पावसाची सूचनाच नव्हे तर इतर बदलत्या हवामानाची पूर्वसूचनाही संगणकाच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे द्राक्ष बागेत आवश्यक उपाययोजना, औषध फवारणी व इतर कामे करणे सोयीस्कर होते. इतर शेतकऱ्यांनीही अत्याधुनिक शेतीचा वापर केल्यास तोटा टाळता येऊ शकेल, असे डॉ. हविनाळे यांनी म्हटले आहे.