पालघर जिल्ह्यतील डहाणू आणि तलासरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसण्याचे सत्र सुरू आहे. या घटनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यकतेनुसार भूकंपग्रस्त भागामध्ये ताडपत्री पुरवण्याची तयारी ठेवली आहे.

२०१९ मध्ये आजवर या भागात २८ मध्यम ते तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्य़ांची नोंद भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. त्यापैकी जानेवारी महिन्यात तीन, फेब्रुवारीत १२, मार्चमध्ये पाच, एप्रिलमध्ये चार मे महिन्यांत तीन धक्के जाणवले.

यापैकी सर्वाधिक तीव्रतेचा ४.३ भूकंपाची नोंद १ मार्च रोजी झाली.  १ फेब्रुवारी रोजी या भागात तब्बल सहा भूकंपाचे धक्के बसल्याचे भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर नोंद करण्यात आली आहे.

डहाणू भागात होणाऱ्या भूकंपाच्या घटनांच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत सर्व संबंधित शासकीय विभागांना भूकंपाच्या अनुषंगाने सतर्क आणि तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांचे छप्पर, भिंतीमध्ये तडा गेल्यास, गळती निर्माण झाल्यास वा घराबाहेर उघडय़ावर झोपण्याची परिस्थिती उद्भवल्यास आवश्यकतेनुसार ताडपत्री पुरविण्याची व्यवस्था शासनाने केल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. भूकंपाच्या सौम्य धक्क्य़ानंतर जिल्हा प्रशासनाने भूकंपाविषयीच्या जागृतीवर भर दिला आहे.

पावसाचीही भीती

अधूनमधून होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे डहाणू आणि तलासरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यात कोसळणाऱ्या पावसामुळे बाहेर उघडय़ावर झोपणे वा वास्तव्य करणे शक्य होत नाही. त्यामुळे या भागातील सुमारे ६० ते ७० हजार नागरिक जीव मुठीत घेऊन घरात वास्तव्य करून आहेत. १० जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी डहाणू परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.६ इतकी नोंदली गेली.