News Flash

‘कृपया दारू पिऊन येऊ नये’

श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘मारईपाटन ते महाकाली’ या दारूमुक्ती व व्यसनमुक्ती यात्रेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नवरगाव

| March 5, 2015 06:46 am

श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘मारईपाटन ते महाकाली’ या दारूमुक्ती व व्यसनमुक्ती यात्रेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नवरगाव या छोटय़ाशा गावातील ५० कुटुंबांनी घरावर स्वत:च्या नावाच्या पाटीऐवजी ‘कृपया दारू पिऊन येऊ नये’ अशा पाटय़ा लावल्या आहेत. सलग २७ दिवस जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १७५ गावांमधून प्रवास करणाऱ्या या यात्रेने किमान दहा गावात या पाटय़ांची नोंद घेतली आहे.
या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानाच्या संयोजिका अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी सलग पाच वष्रे चंद्रपूर जिल्हा दारूमुक्तीसाठी लढा दिल्यानंतर अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण जिल्हा दारूबंदीच्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाचे श्रमिक एल्गारसह जिल्ह्यातील महिलांनी स्वागत केले. मात्र, केवळ दारूबंदी करून चालणार नाही. सोबतच दारूमुक्ती व व्यसनमुक्तीही आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा निर्धार करून ‘मारईपाटन ते महाकाली’ ही यात्रा १० फेब्रुवारीला जिवती तालुक्यातील मारईपाटण येथून काढली. ही यात्रा लांबोरी, येल्लापूर, कोरपना तालुक्यातील वनसडी, कोरपना, नांदा फाटा, वनोजा, राजुरा तालुक्यातील देवाडा, राजुरा, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कोठारी, गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा, गोंडपिंपरी, तारसा, बोरगांव, पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा, पोंभूर्णा, वेळवा, घाटकुळ, मूल तालुक्यातील बेंबाळ, पिपरी दीक्षित, मारोडा, डोंगरगाव, सावली तालुक्यातील पारडी, व्याहाड खुर्द, अंतरगाव, पाथरी, ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी, पांचगाव, चौगान, अडय़ाळ टेकडी, नागभीड तालुक्यातील सुलेझरी, तळोधी, वाढोणा, गिरगाव, सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, सिंदेवाही, शिवणी, नवरगाव आदि गावांवरून चिमूर तालुक्यातील गोंदेडा, चिमूर, भिसी, खडसंगी या गावात पोहचली. या सर्व गावात अ‍ॅड.गोस्वामी व विजय सिद्धावार यांनी जाहीर सभा घेऊन दारूचे दुष्परिणाम गावकऱ्यांना सांगितले.
बहुतांश जाहीर सभांमध्ये तर महिलांनी स्वत:च्या घरातील कटु अनुभव कथन केले. तरुण विधवांपासून तर वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांनी त्यांच्या आयुष्याची करुण व्यथा लोकांसमोर मांडली. दारूमुक्ती व व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन गावागावात जातांना बहुतांश गावातील महिलांमध्ये याबाबत जागृती झाल्याचे चित्रही बघायला मिळाले. नवरगाव या छोटय़ाशा गावात ५० कुटुंबांनी स्वत:च्या घरांवर नावाच्या पाटीऐवजी ‘कृपया दारू पिऊन येऊ नये’ अशा पाटय़ा लावल्या आहेत. घराच्या भिंतीवर ही पाटी वाचूनच मद्यप्राशन केलेला व्यक्ती घरात प्रवेशच करीत नसल्याचा अनुभव महिलांनी कथन केला. केवळ नवरगावच नाही, तर पळसगाव, शिवणी, खडसंगी, चिमूर, गोंदेडा, तळोधी, गिरगांव, चौगान व अडय़ाळ टेकडी या गावातीलही बऱ्याच घरांवर अशाच पाटय़ा बघायला मिळतात. त्यामुळे संपूर्ण गाव दारूमुक्ती झाल्यासारखे दिसते, असे यात्रेचे संयोजक विजय सिद्धावार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. या यात्रेनिमित्ताने गावातील महिला दारूबंदीच्या बाजूने आहेत, असे दिसून आले. या बोलक्या पाटय़ाच आता दारूबंदी अभियान गावागावात राबवित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. यात्रेसाठी गावात घेण्यात आलेल्या प्रत्येक चौक सभेला प्रचंड गर्दी होत असल्याची माहिती सिद्धावार यांनी दिली. येत्या ८ मार्च जागतिक महिलादिनी चांदा क्लब ग्राऊंडवर या यात्रेचा समारोप होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी, श्रमिक एल्गारचे अध्यक्ष राजेश्वर सहारे, उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांच्यासह अनेकांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 6:46 am

Web Title: please do not come home after drinking alcohol
टॅग : Maharashtra
Next Stories
1 खंडणीसाठी शेजाऱ्यांनीच केली शुभमची हत्या, तिघांना अटक
2 स्वतंत्र विदर्भाची घोषणा न झाल्यास मोदींसह मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळू
3 कर्करोगावरील संशोधन केंद्रासाठी लक्ष देऊ
Just Now!
X