अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी जून महिन्यात आत्महत्या केली. मात्र त्यामागचं गूढ वाढलं आहे, कारण त्यांनी कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली ते आम्हाला समजू शकलेले नाही. कोणत्याही संस्थेमार्फत चौकशी करा मात्र आम्हाला कारण कळू द्या अशी मागणी भय्यूजी महाराजांच्या कन्या कुहू यांनी केली आहे. आत्महत्येमागे आर्थिक कारण होतं की कौटुंबिक याची चर्चा सुरु झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर कुहूने ही मागणी केली आहे.

भय्यूजी महाराजांच्या जुन्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता, भय्यूजी महाराजांच्या वकिलाकडे पाच कोटींची खंडणी मागण्यासाठी कट रचला होता अशी कबुली त्याने दिली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुहूने या आत्महत्येमागे काय कारण होते ते शोधून काढा असे म्हटले आहे. महाराज मनाने खंबीर होते त्यांनी अचानक आत्महत्येचा निर्णय का घेतला ते आमच्यासाठी अनाकलनीय आहे असेही कुहूने म्हटले आहे. तसेच जे आरोप होत आहेत त्यावर मी काहीही बोलणार नाही असेही म्हटले आहे.

भय्यूजी महाराज आणि त्यांची पत्नी डॉ. आयुषी यांच्या वकिलाला ५ कोटी खंडणी मागणाऱ्या टोळीला इंदूर पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी जेव्हा या टोळीची चौकशी केली तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली. भय्यूजी महाराज यांचा जुना ड्रायव्हर कैलास या प्रकरणात सहभागी आहे. त्यानेच खंडणी मागण्यासाठी कट रचला होता. भय्यू महाराज यांच्या वकिलाकडे कोट्यवधी रूपये असल्याचा त्याला संशय होता असेही पोलिसांनी म्हटले आहे. तर त्यांच्या मुलीने आता भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येमागचे कारण शोधा असे म्हटले आहे.