भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींना देणे ही काळाची गरज आहे असे मत विदर्भाचे शेतकरी आणि आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी गडकरींकडे भाजपाचे नेतृत्व द्या अशी मागणीही एका पत्रकाद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा 2019 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींना द्यावे असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांचे हे पत्र संघ परिवारातील सर्व ज्येष्ठांना दिले आहे.

पक्ष नेतृत्वाला नोटबंदीचा निर्णय, जीएसटी लागू करण्याचा निर्णय याचा फटका मागील तीन वर्षांपासून बसतो आहे. कृषी आणि आर्थिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांना मंदीचा फटकाही तीन वर्षांपासून बसतो आहे. गॅस जोडणीचा मुद्दा, जागतिक कच्च्या तेलांच्या किंमती हाताळण्यात आलेले अपयश या आणि अशा अनेक विषयांवर संघ परिवारात चिंतन सुरु आहे. अशाच वातावरणात किशोर तिवारी यांनी हे पत्र संघ परिवारातील सगळ्या ज्येष्ठांना लिहिले आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांची धुरा जर नितीन गडकरी यांच्या खांद्यावर देण्यात आली असती तर मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली असती असेही तिवारी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. तसेच छत्तीसगढ आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये भाजपाची दैना झाली नसती असेही त्यांनी म्हटले आहे. देशाला विकासाची आणि युवकांना रोजगाराची गरज आहे. अशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवणारे नेते समाजाला आणि देशाला घातक सिद्ध होतात. भारताला हा इतिहास नवा नाही. भाजपाने नेतृत्व नितीन गडकरींकडे द्यावे डिसेंबर 2012 मध्ये केलेली चूक दुरुस्त करावी अशीही विनंती किशोर तिवारी यांनी पत्राद्वारे केली आहे.