20 April 2019

News Flash

अश्वगंधातली ठेव ही..

‘अश्वगंधा’ या औषधी वनस्पतीपासून लसींची परिणामकारकता वाढवणारा घटक (व्हॅक्सीन अ‍ॅडज्युव्हंट) तयार करण्याच्या संशोधनाला अमेरिकी पेटंट मिळाले

| August 10, 2013 02:08 am

‘अश्वगंधा’ या औषधी वनस्पतीपासून लसींची परिणामकारकता वाढवणारा घटक (व्हॅक्सीन अ‍ॅडज्युव्हंट) तयार करण्याच्या संशोधनाला अमेरिकी पेटंट मिळाले असून पुणे विद्यापीठाचा आरोग्य विज्ञान विभाग, केंद्र सरकारचा विज्ञान-तंत्रज्ञान विभाग व सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त संशोधनातून हे यश मिळाले आहे. या प्रकल्पात सहभागी असलेले प्रमुख संशोधक डॉ. सुरेश जाधव, डॉ. भूषण पटवर्धन व डॉ. मनीष गौतम यांच्या नावाने ६ ऑगस्ट रोजी हे पेटंट देण्यात आले आहे. ‘यूएस ८५०११८६ बी २’ असा या पेटंटचा क्रमांक आहे. हे संशोधन पेटंटबद्ध झाल्याने आता त्यावर कुणालाही दावा करता येणार नाही.
कुठल्याही रोगावरील लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी अश्वगंधा या वनस्पतीपासून तयार केलेला हा पूरक घटक वापरता येऊ शकतो. आयुर्वेदात अश्वगंधाचा वापर शक्तिवर्धक म्हणून केला जातो तसेच त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत. ही औषधी वनस्पती ‘जिनसेंग’ या चिनी वनस्पतीच्या तोडीची आहे. पारंपरिक ज्ञानाचा वापर हा आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानात करणे आवश्यक आहे, त्यादृष्टीनेही या संशोधनाला मिळालेले पेंटट महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने हे संशोधन २००५ पासून सुरू होते, त्यानंतर २००९ मध्ये या संशोधनासाठी भारतात पेटंट मिळाले व आता अमेरिकेतही पेटंट मिळाल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाचे संचालक डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.  
असा तयार होतो घटक
लसपूरक घटक तयार करण्यासाठी अश्वगंधा वनस्पतीचा मुळाचा भाग घेतला जातो नंतर तो गरम पाण्यातून काढून त्याचा अर्क मिळवला जातो तो गाळून अतिसंहत अर्क तयार करतात. ब्यूटॅनॉलचा वापर करून त्यापासून सेंद्रिय अर्क तयार केला जातो. निर्वात पोकळीत त्याचे उध्र्वपातन करून त्यातील द्रावक काढून ७० अंश सेल्सियस तापमानाला विथॅनलाइडसने परिपूर्ण असलेला लसपूरक घटक तयार केला जातो. या संशोधनाचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी त्यात आणखी वैद्यकीय चाचण्या केल्या जातील, असे सिरम इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.

अनेकदा पेटंट घेतली जातात, पण त्याचा वापर होत नाही. त्यामुळे आम्ही या प्रकल्पात व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी असलेल्या सिरम इन्स्टिटय़ूटला सहभागी केले होते. या संशोधनाचा व्यावसायिक वापर होणार आहे यात अजिबात शंका नाही. खासगी-सरकारी क्षेत्रांच्या भागीदाराचाही हा उत्तम नमुना आहे.
डॉ. भूषण पटवर्धन

First Published on August 10, 2013 2:08 am

Web Title: pledge of ashwagandha gets american patent
टॅग Patent