बनावट दस्तावेज तयार करून, बेकायदा सभा घेऊन भूखंड हडप केल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र बळीराम राजपूत यांच्यासह संस्थाचालक डॉ. बाळासाहेब कदम, सहकार अधिकारी डी. आर. मातेरे आदी १२ जणांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार सिडको पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये या १२ जणांवर गुन्हा दाखल केला.
शहरातील सिडको एन ४ येथील प्लॉट नं. २३५, सव्र्हे नं. २३-२४ हा भूखंड ३ फेब्रुवारी २००९ रोजी सोडतीद्वारे विद्यासागर फ्लॅट ओनर्स हाऊसिंग सोसायटीस मिळाला होता. संस्थेचे मुख्य प्रवर्तक पांडुरंग डक यांच्या नावे सोडतीत चिठ्ठी निघाली होती. सोडतीवेळी संस्थेचे सभासद नसलेल्या रवींद्र राजपूत, त्यांची पत्नी, मीनाक्षी, डॉ. बाळासाहेब कदम व त्यांची पत्नी सुवर्णा यांना २०१० मध्ये सिडकोच्या परवानगीने सभासदत्व देण्यात आले. सिडकोच्या माहिती पुस्तिकेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा भूखंड फ्लॅट ओनर्स म्हणून आरक्षित आहे. राजपूत व कदम यांना या भूखंडावर फ्लॅटऐवजी स्वतंत्र बंगले बांधायचे होते. परंतु डक यांना ते मान्य नव्हते. डक यांनी सिडको प्रशासन, तालुका उपनिबंधक कार्यालय, लोकशाही दिन, सिडको पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त यांच्याकडे या प्रकरणी दाद मागितली होती. परंतु संबंधितांकडून दखल घेतली न गेल्याने अॅड. राजेंद्र अंकुशे यांच्यामार्फत त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (१४वे न्यायालय) मीना एखे यांनी आदेश दिल्यानुसार सिडको पोलिसांत सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला.