करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचे सर्वाधिक हाल झाले बेड आणि ऑक्सिजनसाठी. केंद्र सरकारने करोनासंदर्भातील साहित्य खरेदीसाठी आणि मदतीसाठी पीएम केअर्स फंड स्थापन केला होता. या फंडातून राज्यांना व्हेंटिलेटर्स देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना देण्यात आलेली व्हेंटिलेटर्स बंद निघाल्याचं समोर आलं. त्यावरून बराच गदरोळ झाला. बंद व्हेटिलेटर्सच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खंत व्यक्त केली. तसेच “करोनाच्या काळात मला याचे राजकारण करायचे नाही, पण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुद्ध केंद्राकडे तक्रार केली आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार हे सातारा जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांना पीएम केअर योजनेतून मिळालेले व्हेंटिलेटर्स बंद पडले आहेत. राज्याप्रमाणे साताऱ्यालाही व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत, यातील अनेक व्हेंटिलेटर्स चालत नाहीत, असा तक्रार वजा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. त्यावर अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत व्हेंटिलेटर्स निर्मात्या कंपन्यांबद्दल खंत व्यक्त केली.

इथं परिस्थिती काय… तुम्ही करताय काय?; अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

“पीएम केअरमधून अनेक व्हेंटिलेटर्स यंत्रं उपलब्ध झाली आहेत, पण अनेक ठिकाणी ही व्हेंटिलेटर्स बंद पडली आहेत. करोनाच्या काळात मला याचे राजकारण करायचे नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केंद्राकडे याबाबतची तक्रार केली आहे. मुळात करोनाच्या या परिस्थितीत ही व्हेंटिलेटर्स बनविणाऱ्यांनी थोडी माणुसकी दाखवायला पाहिजे होती,” असं अजित पवार म्हणाले.

वस्तू व सेवा कराचे २२ हजार कोटी तातडीने देण्याची अजित पवारांची मागणी

“पुण्यामध्ये सुद्धा आलेली यंत्रे बंद पडली, यावर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून या क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना बोलवून ही यंत्रे दुरुस्त करून वापरात घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र साताऱ्यामध्ये असे तंत्रज्ञ लगेचच उपलब्ध होतील की, नाही हे माहित नाही. परंतु पुण्याच्या आयुक्तांशी चर्चा करून येथील तज्ञ बोलावून हे यंत्र दुरुस्त करून घ्यावेत, असे प्रशासनाला सूचविले आहे. ज्या कंपन्यांनी ही यंत्रे पुरवली त्यांची काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे आणि त्यासाठी तरी थोडी माणुसकी दाखवावून यंत्रे दुरुस्तीची प्रक्रिया राबवायला पाहिजे होती. पण ते झाले नाही,” अशी निराशा अजित पवार यांनी व्यक्त केली.

“करोनातून बरे झालेल्या अनेकांना काळी, पांढरी, पिवळी बुरशी (ब्लॅक, व्हाईट, यलो म्युकरमायकोसिस) हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. आपल्याकडची करोनाची आकडेवारी पाहता या आजाराने राज्यात रुग्ण दगावू नयेत व प्रसार वाढू नये म्हणून या क्षेत्रातील तज्ञांकडून राज्य पातळीवर मोठे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.