नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेल्या निवडणुकीत मिळालेले हे यश भाजपसाठी अतिशय महत्त्वाचे होते. ‘या निवडणुकीत जे मंत्री चांगली कामगिरी करणार नाहीत, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल,’ असा आदेश पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला होता, अशी माहिती आता समोर येते आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका भाजपसाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यामुळेच मंत्र्यांसह सर्वच भाजप नेत्यांना चांगली कामगिरी करण्याचे आदेश थेट पंतप्रधान मोदींकडून देण्यात आले होते. ‘जे मंत्री या निवडणुकीत अपयशी ठरतील, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल,’ असा स्पष्ट आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. पंतप्रधानांचा हा आदेश मुख्यमंत्र्यांनी जशाच्या तसा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवला होता.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला असता, तर त्याचे सारे खापर नोटाबंदीच्या निर्णयावर फुटणार, याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होती. त्यामुळेच पंतप्रधानांनी सर्वच मंत्र्यांना चांगली कामगिरी करण्याचे आदेश दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजपमधील सर्व प्रमुख नेत्यांनी आणि मंत्र्यांची बैठक घेतली आणि कामाला लागण्याच्या सूचना केल्या. यानंतर सर्व नेते जिल्ह्यात तळ ठोकून बसले होते.

खुद्द पंतप्रधान मोदींनी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातल्याने भाजप नेत्यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली. पंतप्रधान मोदींच्या कठोर आदेशाचा परिणाम सोमवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये दिसून आला. नगरपालिका आणि नगराध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणी भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला. मात्र या निवडणुकीत भाजपच्या काही दिग्गजांना पराभवाचा झटका बसला आहे. यामध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा समावेश आहे. आता चांगली कामगिरी करु न शकलेल्या या नेत्यांवर काय कारवाई होणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने तब्बल ३१ नगरपालिका जिंकल्या आहेत. याशिवाय ५२ नगरपालिकांमध्ये भाजपचे थेट नगराध्यक्षदेखील निवडून आले आहेत. यामुळे भाजपने नगरपालिका निवडणुकीसाठी आखलेली व्यूहनिती संपूर्णपणे यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.