पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळत आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच बंगालमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रामुळे वाद उभा राहिला होता. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादींने मोदींना चिमटा काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

आणखी वाचा- पेट्रोल पंपावरील मोदींचे फलक बदलले

“पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

काय आहे चर्चा?

बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या छायाचित्रालाविरोध करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातही याबद्दल नाराजीचा सूर लावला जात आहे. सध्या दुसरी लस दिलेल्यांच्या भ्रमणध्वनीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे एक संदेश येतो. त्यावरील लिंक उघडल्यास प्रमाणपत्रावर लाभार्थ्यांचे नाव, लिंग, ओळख क्रमांक, लसीकरणाची तारीख, कोणती लस दिली याबाबत माहिती दिसते. त्यात ‘दवाई भी और कडाई भी’ या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र बघून वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, गोवरसह इतर लशीकरणाच्या नोंदीच्या कागदांवरही कधी कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात तसेच लाभार्थ्यांमध्ये होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi photo on vaccination certificate ncp leader nawab malik attack on narendra modi bmh
First published on: 06-03-2021 at 15:39 IST