पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयपीएलच्या कॅप्टनप्रमाणे असून मी चांगला फलंदाज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाचा काहीही फायदा होणार नसून २०१९ मध्ये भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना, भाजपा आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावर भाष्य केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुरुवातीपासून भाजपा आणि शिवसेनेची युती असावी, अशी इच्छा होती. मात्र काही दिवसांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज आहेत. त्यांच्या नाराजीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून ते लवकरच उद्धव ठाकरेंना दिल्लीत बोलावून घेतील. उद्धव ठाकरे यांची नाराजी दुर होईल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अनेक भाषणात हे भाजपा सरकार दलितविरोधी असल्याचे सांगत मोदीविरोधी भाषण करतात. पण त्यांच्या भाषणाचा काहीही फायदा होणार नसून २०१९ मध्ये भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला. सध्या आयपीएलचा वारे वाहत आहेत. आयपीएलमध्ये चांगला कर्णधार आणि धावा चोपणारा फलंदाज असलेल्या संघाचा विजय होतो. त्याच प्रमाणे मोदी हे आयपीएलमधील कॅप्टन असून मी धावांची बरसात करणारा फलंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर झाला आहे. तर संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत क्लीन चीट दिली आहे. याबाबत आठवलेंना विचारले असता ते म्हणाले, न्यायालय आणि पोलिसांपुढे कोणीही मोठा नसून भीमा कोरेगाव घटने मागील मुख्य सुत्रधार सापडला पाहिजे. तसेच संभाजी भिडे यांच्याबाबत पोलिसांनी गांभीर्याने तपास करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आरपीआयचा मेळावा पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर २७ मे रोजी घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला चार लाख नागरिक येतील आणि त्यांचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.