भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंदी छावण्यांबाबत (Detention Centre) खोटं बोलत आहेत असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. देशाच्या ७२ वर्षांच्या इतिहासात लोकशाहीची उज्ज्वल परंपरा आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन हा आदरपूर्ण आहे. अशात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत आणि देशाची ही पत धुळीला मिळवत आहेत असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी  मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

पंतप्रधान सध्या जे वागत आहेत ते पाहून देशातल्या बहुतांश लोकांची अवस्था सिंहासन या सिनेमातल्या दिगू टिपणीससारखी होईल असाही टोला सचिन सावंत यांनी लगावला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात २०१४ ते २०१९ या सालापर्यंत मोदी सरकारमध्ये कोणत्याही स्तरावर NRC आणि (Detention centre )बंदी छावण्याबाबत चर्चा झाली नाही असे अत्यंत खोटे विधान केले होते यावरुनच सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटेपणाचा आरोप केला आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्य व केंद्र शासित प्रदेशामध्ये बंदी छावण्या उभारण्यासंदर्भात योजना होती हे सचिन सावंत यांनी कागदपत्रासह उघड केले. ९ जानेवारी २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग आणि प्रधान सचिव गृह विभाग यांना पाठवलेल्या पत्रानुसार बंदी छावण्यासंदर्भात ९-१० सप्टेंबर २०१४ आणि ७ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आले होते. या बंदी छावण्यांचा आराखड्याचा मसुदा तयार करण्यासंदर्भात ३० ऑक्टबर २०१८ रोजी सर्व राज्यांच्या व केंद्र शासित सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केंद्रीय अधिकाऱ्यांनी चर्चा करुन त्यांचे मत घेतले होते असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

१६ ऑगस्ट २०१६ चे राज्याच्या गृहविभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवलेले पत्र दाखवून सावंत म्हणाले ही, या पत्रानुसार केंद्र सरकारच्या ९ जानेवारी २०१९ च्या आदेशाने राज्याच्या गृहविभागाने सिडकोकडे तात्पुरती बंदी छावणी उभारण्याकरता प्लॉट क्रमांक १४ सेक्टर क्रमांक ५ नेरुळ येथे जागा मागितली होती तसेच कायमस्वरुपी बंदी छावणी उभारण्यासाठी सिडकोकडे ३ एकर जागा नवी मुंबईत उपलब्ध करण्यास सांगितले होते. याबरोबरच बंगरुळू येथे बंदी छावणी तयार झालेली आहे हे स्पष्ट दिसत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या ९ महिन्यांपासून देशात प्रथम नागरिकता संशोधन कायदा येईल आणि नंतर देशपातळीवर NRC लागू करण्यात येईल असे म्हटले होते. तसेच जाहीरपणे संसदेतही सांगितले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही केंद्र सरकारच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर एनआरसी आणणे अंतर्भूत आहे. असे म्हटले असतानाही पंतप्रधान खोटे सांगत आहेत. काँग्रेस पक्षाने जाहिर केलेल्या कागदपत्रानुसार वेगवेगळ्या स्तरावर सातत्यपूर्ण बंदी छावण्याबाबत केंद्र सरकारकडून चर्चा झालेली आहे स्पष्ट आहे. म्हणूनच दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांचा विश्वासघात करत आहेत आणि खोटे बोलत आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, राजन भोसले उपस्थित होते.