नाशिक जिल्ह्यातील राजेंद्र जाधव यांच्या करोना लढ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी गावात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून छोट्या टँकरने सॅनिटायझर फवारणी सुरू केली. त्यांच्या या कामाची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली आहे. राजेंद्र जाधव यांच्यासारखी देशातील अनेक उदाहरणं आहेत. जी करोनाविरूद्ध लढा देत आहेत. कोविड-19 वर विजय मिळवून देणारे हे अभिनव फवारणी यंत्र असल्याने राजेंद्र जाधव यांनी आपल्या या यंत्राला ‘यशवंत’ असे नाव दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत, त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी मोठी मदत झाली झाली आहे व होणार आहे, त्यामुळे या उल्लेखनीय निर्मिती कार्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात विशेष कौतुकोद्गार काढून संशोधकांचा गौरव केला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोना उच्चाटनाच्या युद्धात मोठे बळ मिळाले आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते संशोधक राजेंद्र जाधव यांच्या या शोधामुळे नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेकडून कोरोना विरोधात लढा सुरू आहे. असे असले तरी रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कंपाऊंड गेट, भिंती आदींना माणसांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणाऱ्या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. हे आव्हानात्मक काम मनुष्यबळाची कमतरता असल्याने इच्छा असूनही होताना दिसून येत नाही. मात्र मनुष्यबळाचा वापर न करता झपाट्याने फैलावत असणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी संभाव्य संसर्गित जागांची तातडीने फवारणी करणे अत्यावश्यक ठरते. वऱ्हाणे ता. बागलाण येथील शेतकरी, संशोधक राजेंद्र जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले होते. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. आरोग्य खात्याच्या मानकाप्रमाणे ह्या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला मोठे बळ मिळाले. कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीत सॅनिटायझेशनसाठी ह्या यंत्रामुळे आत्मनिर्भरतेची शिकवण मिळाली.

त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ठरलेल्या यंत्राची दखल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून देशवासीयांशी संवाद साधला. ह्या संवादावेळी प्रधानमंत्री यांनी संशोधक तथा शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या संशोधक कार्याचा गौरवास्पद उल्लेख केला. त्यामुळे यंत्रभूमी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कुशलता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. राजेंद्र जाधव यांनी केलेल्या या प्रयोगामुळे कोरोना संकटात निर्जंतुकीकरण मोहिमेला मोठा वेग आला आहे. भविष्यकाळात या यंत्रामुळे प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला खूप मोठा आधार मिळणार आहे. त्यांनी बनवलेल्या या यंत्रांचे नाव त्यांनी ‘यशवंत’ ठेवले असून त्यांच्या या यशवंत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi man ki bat rajendra jadhav nashik nck
First published on: 31-05-2020 at 12:16 IST