वाढती रुग्णसंख्या आणि लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्य सरकार आणि केंद्रामध्ये वाद सुरु असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संदेश देत करोना महामारीशी लढत असताना आपण कोणत्याही प्रकारच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला आपण समर्थन देत नसल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“राज्यांमध्ये सध्या करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन जणू काही स्पर्धा सुरु आहे. हे राज्य पूर्णपणे निरुपयोगी आहे आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे. ते राज्य खूप चांगलं काम करत आहे. राज्यांची तुलना करणं आजकाल एक फॅशन झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकावर लसींच्या पुरवठ्यावरुन केलेल्या टीकेनंतर नरेंद्र मोदींनी हे विधान केलं आहे.

करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या!

“जर रुग्णसंख्या जास्त असेल तरी तुम्ही जास्त चिंता करु नका असं मी सांगितलं आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपली कामगिरी खराब आहे अशा दबावात राहू नका. मी आत्ताही तुम्ही टेस्टिंगकडे लक्ष द्या असं सांगत आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपण खराब कामगिरी करत आहोत असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवलं तर रुग्णसंख्या अजून वाढताना दिसेल,” असं नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वस्त करताना सांगत होते.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

दरम्यान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पुन्हा एकदा टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यास सागितलं. “करोनाशी लढताना टेस्टिंग हा एकमेव मार्ग आहे. ७० टक्के आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचं आपलं टार्गेट आहे. टेस्टिंगमध्ये काही अधिकाऱ्यांकडून आळशीपणा होत असल्याचा रिपोर्ट माझ्याकडे आला आहे. टेस्टिंग केल्याशिवाय योग्य निकाल येणार नाही,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी समन्वयाने काम करावे त्यातूनच करोनावर मात करणे शक्य आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं.

करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या – उद्धव ठाकरे</strong>
करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कुठलंही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. करोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत. मात्र केंद्रानेही लशींचा जादा पुरवठा करावा, तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसनयंत्रे (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना केली.