काही ठिकाणी वीज उपलब्ध, तर काही ठिकाणी जोडणीच नाही. टीव्ही आहे, पण बिघडला किंवा टीव्हीच उपलब्ध नसल्याने मराठवाडय़ातील केवळ ५० टक्के शाळांमध्येच मोदी गुरुजींचे शिक्षकदिनाचे भाषण पाहणे शक्य होणार आहे. मराठवाडय़ातील १० हजार ८१३ शाळांमध्ये मोदींच्या भाषणाचे टीव्हीवरून थेट प्रक्षेपण दाखविणे शक्य आहे, तर ८ हजार ११० शाळांमध्ये रेडिओ हाच पर्याय वापरला जाईल, असे शिक्षण उपसंचालकांनी वरिष्ठांना कळविले आहे.
मराठवाडय़ात २० हजार ३०७ शाळांपैकी ८ हजार ११० शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण रेडिओवरून ऐकविले जाणार आहे. कारण बहुतांश शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही. काही ठिकाणी वीज आहे, पण वायरिंग जुनी झाली आहे. परिणामी एक करायला जायचो आणि नवेच काही तरी व्हायचे, असे वाटल्याने शिक्षकांनी रेडिओचाच पर्याय स्वीकारला आहे. शाळांना दिलेले काही टीव्ही केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेपर्यंत पोहोचविलेच नव्हते. बुधवारी दिवसभरात प्रत्येक शाळेवर टीव्ही पोहोचविण्याची घाई सुरू होती. दिवसअखेर कोणत्या शाळेत कशा पद्धतीने मोदींचे भाषण ऐकविले जाईल, याची आकडेवारी गोळा करण्यात आली. तेव्हा इंटरनेट व संगणकच्या साह्य़ाने १ हजार २५९ ठिकाणी मोदींचे भाषण ऐकविले जाईल, असाही अहवाल देण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्य़ात ३ हजार ८८७ शाळांपैकी १ हजार ९६७ शाळांमध्ये रेडिओचा पर्याय शिक्षकांनी स्वीकारला. बहुतेक शाळांमध्ये टीव्ही उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत वीज उपलब्ध आहे किंवा नाही याची आकडेवारी ईएमआयएसद्वारे घेतली जात असे. वीजजोडणी व शाळांमधील वायरिंग दुरुस्तीसाठी तरतूद केली जात असे. नव्याने केलेल्या पाहणीत हे काम झाले होते की नाही आणि केले होते तर त्याचा दर्जा काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. एवढेच नाही, तर शाळांना टीव्हीही देण्यात आले होते. काही लोकप्रतिनिधींनी या साठी निधी दिला होता. तोहा पैसा नीट खर्च केला की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतरत्र कुरकुर, नांदेडात उत्साह!
वार्ताहर, नांदेड
काही संघटना व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सक्तीने ऐकण्यासंदर्भात कुरकुर करीत असले, तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात, विशेषत नांदेड तालुक्यातील सर्वच शाळांनी शिक्षकदिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे. एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने व्हॉट्स अॅपवर पत्र पाठवून सर्व सहकाऱ्यांना हा कार्यक्रम घेणे किती महत्त्वाचे आहे, याचे विश्लेषण केले.
देशाचा पंतप्रधान प्रथमच विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधणार असल्याने अनेक शिक्षक-मुख्याध्यापकांमध्ये उत्सुकता आहे. प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमाची अनेक शाळांनी जय्यत तयारी केली. नांदेड तालुक्यात विस्तार अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर बठका घेऊन शाळांना सूचना दिल्या. नांदेड तालुक्यात बहुतांश शाळांनी हा उपक्रम उत्साहवर्धक करण्याची तयारी केली. मुदखेडसह काही तालुक्यांत मात्र अशा प्रकारे प्रबोधन झालेच नाही. त्यामुळे त्या भागात हे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत जाते की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
राज्य शिक्षक समिती कार्याध्यक्ष चंद्रकांत कुणके यांनी व्हॉट्स अॅपद्वारे सहकाऱ्यांना या बाबत आवाहन केले. शिक्षकदिनी पंतप्रधानांचे भाषण हा सांस्कृतिक उत्सव म्हणून मुलांसोबत साजरा करू या, असे त्यांनी म्हटले आहे. शहरातील काही मोठय़ा शाळांत मदानाअभावी होणारी अडचण लक्षात घेता ठिकठिकाणी एलसीडी, प्रोजेक्टरद्वारे भाषण ऐकविले जाणार आहे. पावसाचे दिवस लक्षात घेऊन काही शाळांनी मंडप उभारला आहे.