27 September 2020

News Flash

लोकसभेसाठी भाजपच्या प्रचाराला ‘उज्ज्वला’चे इंधन!

ग्रामीण भागांत इंधन म्हणून लाकुडफाटा तोडून गोळा करण्यात महिलांची मोठी शक्ती खर्च होते. त्या

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी रणनीती

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘चाय पे चर्चा’ असा भाजपचा प्रचाराचा नूर होता. आता महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘उज्ज्वला की चाय, उज्ज्वला की रसोई’ अशी रणनीती ठरविण्यात आली आहे.

महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ही व्यूहरचना केली असून ज्या महिला लाभार्थीना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला आहे, अशा महिलांची प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बैठक घेतली जाणार आहे. या देशभरात पाच कोटी ८० लाख महिलांना गॅसजोडणी मिळालेली आहे. तसेच जनधन योजनेतही महिलांची बँक खाती अधिक उघडली गेल्याने त्यांची बचत वाढून त्यांना आत्मसन्मानही मिळाला आहे. त्यामुळे महिला मतदारांना प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्याचा पक्षाचा विचार आहे.

ग्रामीण भागांत इंधन म्हणून लाकुडफाटा तोडून गोळा करण्यात महिलांची मोठी शक्ती खर्च होते. त्यातून सुटका करून देणारी गॅसजोडणी योजना केंद्र सरकारने सुरू केली. त्यातील लाभार्थ्यांपैकी अनेकांना गॅसची दुसरी टाकी घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, ही संख्या तुलनेने फारच कमी असल्याचा दावा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर करतात.

गावागावांत विविध योजनांच्या लाभार्थी महिलांची बैठक घेतल्यानंतर त्याच घरात या योजनेतून लाभ घेतलेल्या घरी चहा-पाणी होईल आणि सरकारच्या योजनांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली जाईल. काही राज्यांमध्ये या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद लाभला होता. आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. केवळ एवढेच नाही, तर जनधन योजनेतून ३१ कोटी ६१ लाख व्यक्तींची खाती काढण्यात आली. त्यातील ५३ टक्के खाती महिलांची होती. घरात पुरचुंडीला असणारी कष्टकरी महिलांची बचत यामुळे बँकेत जमा होऊ लागली. व्यसनासाठी पैसे मागणाऱ्या नवऱ्याचा त्रास सोसणाऱ्या महिलांना तर या योजनेचा कमालीचा लाभ झाला. परिणामी ही योजनाही महिलांमधील प्रचाराच्या केंद्रस्थानी आणली जाणार आहे.

महिला बचतगटांमध्ये २० लाखांनी वाढ झाली आहे. मुलींसाठी शालेय स्वच्छतागृहांच्या संख्येतही ४.५ लाखांनी वाढ झाली आहे, असा संघटनेचा दावा आहे.

केंद्र सरकारच्या बहुतांश योजनांचा महिलांना अधिक लाभ झाला आहे. गॅसजोडणनंतर बाईला होणारा आनंद मोठा आहे. त्यातील अडचणीही आम्ही सोडवत आहोत. याशिवाय विविध निर्णयांची माहितीही दिली जाणार आहे.

– विजया रहाटकर, राष्ट्रीय अध्यक्षा, भाजप महिला मोर्चा.

लाभाची आकडेवारी..

योजना                      लाभार्थी महिला

उज्ज्वला गॅसजोडणी                  ५.८० कोटी

मुद्रा कर्ज योजना                        ९ कोटी

प्रधानमंत्री                                   सुमारे एक कोटी घरे

आवास योजना

सौभाग्य विद्युतीकरण                  २१ कोटी घरे

(ही आकडेवारी भाजप महिला मोर्चाने जारी केली आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2018 2:54 am

Web Title: pm ujjwala yojana bjp new strategies to attract women voters
Next Stories
1 उंचावलेल्या विरोधाच्या डाव्या सुराला राष्ट्रवादीची साथ
2 औरंगाबाद जिल्ह्यातील तीनशे गावात जलयुक्तची कामे
3 …तर डी. वाय. पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंबंधीचा आरोप गंभीर मानला असता : अजित पवार
Just Now!
X