आंबे, काजू आणि इतर रानमेवा चापण्यासाठी सुटी घेऊन कुटुंबकबिल्यासह गावची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांच्या कोकणवाऱ्या वाढल्या असल्या तरी सध्या त्यांना मुंबईतील ‘मेगाब्लॉक’सारखा वाईट अनुभव येत आहे. शनिवारी मुंबई गोवा महामार्गावर या चाकरमान्यांना कित्येक तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. शनिवारी दुपापर्यंत ही कोंडी सुटू शकली नव्हती. वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
उन्हाळ्याच्या सुट्टय़ा सुरू झाल्याने चाकरमान्यांचे पाय आता कोकणाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. याचा परिणाम आता इथल्या वाहतुकीवर होऊ लागला आहे. त्यात दोन दिवस लागून सुट्टय़ा आल्याने शुक्रवारी कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या नेहमीहून अधिक वाढली. अरुंद रस्ते आणि वाहन चालकांची घाई यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
शुक्रवारी रात्रीपासून रायगड जिल्ह्य़ातील मुंबई-गोवा महामार्गावरील हमरापूर ते गडब, सुकेळी खिंड ते वाकण फाटा, कोलाड ते कोलाड ब्रिज आणि माणगाव ते इंदापूर या टप्प्यात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर पाहायला मिळत होत्या. त्यामुळे आठ ते दहा किलोमीटरच्या प्रवासाला दीड ते पावणे दोन तास लागत होते.
 शनिवारी दुपापर्यंत माणगाव परिसरात ही वाहतूक कोंडी कायम होती. दुपारनंतर संथ गतीने वाहतूक सुरू करण्यात पोलिसांना यश आले; मात्र अतिउत्साही वाहनचालक यात भर घालत होते. या मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांचे ‘मेगा हाल’ झाले. रायगड जिल्ह्य़ातील पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. याचा परिणामही वाहतुकीवर होत असल्याचे दिसून आले. रेल्वेची आणि एसटीची बुकिंग फुल झाल्याने खासगी गाडय़ांनी प्रवास करण्याकडे चाकरमान्यांचा कल दिसून येतो आहे. यामुळे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होते आहे.
तळकोकणात चाललात? वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रायगडच्या वाहतूक नियंत्रण शाखेने महामार्गावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी महामार्गावर टप्प्याटप्याने उभे ठेवण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांची मदत घेतली जाते आहे. मात्र वाहनांची संख्याच इतकी जास्त आहे की ही वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी अजूनही काही तास लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक भोसले यांनी दिली. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी साधारणपणे रात्रीचा प्रवास करण्यावर वाहनचालकांचा कल आहे. अशात शनिवारी रात्री जर मुंबईतून येणाऱ्या वाहनांची संख्या अजून वाढली तर ही कोंडी अजून वाढू शकते, अशी भीती भोसले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तळकोकणात जाणार असाल तर वाहनांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-कोल्हापूर मार्गाचा वापर करावा, असेही त्यांनी सुचविले.