‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्हावर..आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’ यांसह इतर अनेक कवितांच्या माध्यमातून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम १० वर्षे होऊनही मार्गी लागत नसल्याने साहित्यप्रेमींमध्ये नाराजीची भावना आहे. जळगावजवळील आसोदा या बहिणाबाईंच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा विषय १० वर्षांपासून रखडला असताना आता स्मारकाच्या मूळ आराखडय़ात बदल करण्याचा घाट घातला जात आहे.

घरातील किंवा शेतातील कामे करताना काव्यात्मक स्वरूपात लेवा गणबोली आणि अहिराणी भाषेत मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचा जन्म आसोदा येथे झाला. बहिणाबाईंच्या अनेक कविता विविध शालेय अभ्यासक्रमांमध्ये आजही शिकवल्या जातात. त्यांच्या सन्मानार्थ आसोदा गावात स्मारक उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. २००७ मध्ये प्रथमच ही मागणी पुढे आली. यासाठी निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विकास मंचची स्थापना करण्यात आली. स्मारकासाठी आसोदा ग्रामपंचायतीने गावठाणची एक हेक्टर १६ आर जागा उपलब्ध करून दिली. जळगावचे तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. २०१२ मध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडून यास मंजुरी मिळाल्यानंतर २०१३ मध्ये तीन कोटी ६० लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाला. अॅम्फी थिएटर, संग्रहालय, ग्रंथालय, बहिणाबाईंचा पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण असा आराखडा निश्चित करून कामाला सुरुवात करण्यात आली. सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले असताना त्याच वेळी निवडणुकीचे वारे वाहू लागले. राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर जाहीर झालेल्या नवीन धोरणानुसार जिल्हा नियोजनमधून कोणत्याही स्मारकासाठी निधी खर्च करता येणार नाही, असा ठराव झाल्याने तीन वर्षे काम थांबले. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पाठपुरावा करत ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून विशेष निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगावने नऊ कोटी ५० लाख रुपयांचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

Vasudev, Vasai, voting,
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

स्मारकासाठी विकास मंचचे अध्यक्ष किशोर पाटील प्रयत्न करीत आहेत. विषय मार्गी लागत नसल्याने जनभावना लक्षात घेऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून विशेष बाब म्हणून चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर केले. परंतु, यात जुन्या मूळ प्रस्तावातील तीन कोटी ५० लाख आणि अतिरीक्त केवळ एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आधी झालेले काम आणि आता सुधारित मंजूर रक्कम अशा सुमारे सहा कोटींतून स्मारकाचे काम करावयाचे असल्याने आधी मंजूर करण्यात आलेल्या आराखडय़ात मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. १८ मीटरच्या स्मारकाची उंची केवळ आठ मीटर करण्यात आली. आधीच्या भव्य स्मारकाऐवजी साध्या पद्धतीने काम पूर्ण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप किशोर चौधरी यांनी केला आहे. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाईंचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला द्यावे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. लेवा समाजाच्या पाडळसे येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातही या विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयावरून राजकारण खेळले जात असताना बहिणाबाईंच्या स्मारकाला न्याय देण्यासाठी कोणीच ठोस भूमिका घेत नसल्याने साहित्यक्षेत्रात नाराजीचा सूर उमटत आहे.

शासन जळगावच्या नाटय़गृहासाठी ३० कोटी रुपये खर्च करते, पण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी आढेवेढे घेते. बहिणाबाईंच्या स्मारकासाठी पैसे नाहीत, असे शासनाने स्पष्ट सांगावे. आम्ही लोकवर्गणी जमा करून भव्य स्मारक उभारू.     – किशोर चौधरी (अध्यक्ष, निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विकास मंच)