काही दिवसांपूर्वीपर्यंत करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेले पोफळी गाव अखेर शंभर टक्के रोगमुक्त झाले आहे.

पोफळी गावात कोयना जलविद्युत प्रकल्पाचे कार्यालय आणि महानिर्मिती कंपनीची कर्मचारी वसाहत आहे. येथे काम करणारे अधिकारी व कर्मचारी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काही कर्मचारी व अधिकारी बाधित झाले. मुंबईतून आलेले गावातील चाकरमानी व त्यांचे नातेवाईकही करोनाबाधित आढळून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सुचिता सुवार यांनी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना पोफळी गावात सर्वेक्षण करण्याची सूचना केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी पोफळीत आरोग्य सर्वेक्षण सुरू केले. गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन करोनाबाबत जनजागृती केली. घरातील आजारी व्यक्तीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरवण्यात आली. करोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना क्वोरंटाईन करण्यासाठी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी मोलाचे योगदान दिले. ग्रामपंचायतीतर्फे मास्क, सॅनिटायझर आणि साबणाचे वाटप करण्यात आले. तरीही गावात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली. त्यामुळे पोफळी करोनाचे हॉटस्पॉट बनले होते. पण आरोग्य विभागाच्या यंत्रणेने नेटाने प्रयत्न करत कोरोना रूग्ण शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी तत्परता दाखवली. त्यामुळे ६६ पैकी ६३ जणांनी या महामारीवर मात केली. केवळ तिघांचा मृत्यू झाला. पण पोफळी गाव शंभर टक्के करोनामुक्त झाले आहे.

शिरगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणालिनी जाधव यांनी सांगितले की, गावात सध्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम चालू आहे. गावात ३ हजार ४६० कुटुंबे आहेत. यातील १२ हजार ७६२ लोकांपर्यत आम्ही पोहचलो आहोत. त्यापैकी  फक्त दोघांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली. एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९९५ करोनामुक्त

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी आणखी ३१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर बुधवारी  ४२ करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकूण ३ हजार ९९५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. बुधवारपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ६४० तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२१ झाली आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे त्यामुळे सामुदायिक संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जावेत म्हणून मागणी करण्यात येत आहे.