– श्रीराम महाजन

आंबेनळी घाटातल्या दुर्घटनेने प्रत्येक दापोलीकर आतून हलला. जवळजवळ सगळे ओळखीचे होते. काहीजण खास मित्र होते. तीनजणं कॉलेजला माझ्या वर्गात होते. चारजणं माझे विद्यार्थी . अनेकांशी कौटुंबिक संबंध होते.

साधारण बारा वाजता विद्यापीठाच्या गाडीला महाबळेश्वरजवळ अपघात झाल्याचं कळलं .पण त्याचं गांभीर्य लक्षात आलं नव्हतं. दीड-दोनच्या सुमारास जसजशा बातम्या, फोन येऊ लागले तसतसं वातावरण निःस्तब्ध होऊ लागलं. दुःखाचे ढग दाट होऊ लागले. काहीही सुचेनासं झालं .इतक्यात सहलीला गेलेल्यांची नावं एका मेसेजमध्ये आली आणि लक्षात आलं की यातील अनेकांची मुलं आत्ता शाळेत आलेली आहेत. एका वर्गात गेलो. तिथे यापैकी दोघांची मुलं होती. बिचाऱ्यांना नियतीने त्यांच्याशी किती क्रूर खेळ खेळलाय याची कल्पनाच नव्हती. कोणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. शाळा सोडायचा निर्णय झाला. मुलांना शाळा सोडण्याचं कारण सांगू नये, अशा सूचना वर्गशिक्षकांना देण्यात आल्या. मुलं बाहेर पडली.

आठवीतील एक हुशार आणि गुणी विद्यार्थिनी मी प्रवेशद्वाराशी होतो, तिथे काही काळ घुटमळत होती. मैत्रिणींबरोबरच्या तिच्या बोलण्यात महाबळेश्वरला काही अपघात झाल्याची कुणकुण तिला लागल्याचा जाणवलं. त्यामुळे ती व्यवस्थित घरी जातेय ना हे पाहण्यासाठी एका सहकारी शिक्षकाबरोबर मी निघालो. ती एका मैत्रिणीबरोबर सायकलने निघाली. आम्ही ती ज्या वळणावर वळणार तिथे न वळता थोडं पुढे जाऊन दुसरंच काही काम करतोय असे थांबलो. ती वळणावर वळणार इतक्यात तिचं आमच्याकडे लक्ष गेलं. ती तशीच पुढे येऊन माझ्यासमोर थांबली. मला हे अनपेक्षित होतं. ‘ सर महाबळेश्वरला अपघात झाला म्हणून शाळा सोडली का?’ तिने विचारलं. माझ्या तोंडून कसंबसं ‘ हो’ म्हणून उत्तर गेलं. तिच्या चष्म्याआड डोळ्यांत दाटलेले पाणी स्पष्ट दिसत होतं. मी बधीरच झालो होतो. इतक्यात तिच्या आवाजाने सावध झालो. ‘ सर , माझे बाबा गेलेत हो त्या सहलीला. तुमच्या मोबाईलवरून त्यांना जरा फोन लावून द्या ना. मला बोलायचय त्यांच्याशी.’ क्षणभर काळजाचा ठोका चुकला. कसंबसं तिला म्हटलं ‘ अगं तिथे पंचनामा सुरू असल्यामुळे सगळ्यांचे फोन बंद आहेत.’ ती फक्त ‘बरं’ म्हणाली आणि घरी जायला निघाली. तिच्या ‘ बरं ‘ या शब्दात ‘सर सांगताहेत म्हणजे माझे बाबा सुखरूप आहेत ‘हा विश्वास होता. ती वळली मात्र आणि इतका वेळ महत्प्रयासाने आवरलेले अश्रू अनावर होऊन माझ्या डोळ्यातून वाहू लागले. कारण मृतांच्या यादीत तिच्या वडिलांचं नाव मी वाचलं होतं.
माफ कर मुली, त्यावेळी तुझ्याशी खोटं बोलण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

(लेखक दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक आहेत)