विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हा पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांनी प्रतिबंधात्मक कारवाई व अवैध व्यावसायांना लगाम घालण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही शिर्डी, राहाता व लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ कागदोपत्री जुजबी कारवाई दाखविली जात आहे. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम अवैध व्यावसाय चालू आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडाव्यात यासाठी  पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांतता भंग करणारे, दहशत निर्माण करणारे मोकाट गुन्हेगार, तुरुंगाच्या बाहेर आलेले सराईत गुन्हेगार तसेच समाजासाठी अपायकारक असलेल्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई बरोबरच अवैध प्रवासी वाहतूक, मटका, जुगार, मद्य्विक्री अशा व्यावसायांनाही आळा घालून या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याच्या सूचना आहेत. शिर्डीत मात्र छुप्या पध्दतीने अवैध प्रवासी वाहतुक चालूच असून वाहतूक शाखेनेही कागदोपत्री कारवाई करुन आपले उद्दिष्ठ साध्य केले आहे. शिर्डी-शनििशगणापूर अवैध प्रवासी वाहतूक खुलेआमपणे चालू आहे. पोलिसांनी केवळ रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे धोरण घेतल्याने रिक्षा चालकांनी पोलिसांच्या या दुटप्पी धोरणाबाबत संताप व्यक्त केला आहे.
जुगार, मटका व अवैध मद्य्विक्री सर्रासपणे सुरु असूनही, या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा कानाडोळा असल्याने या व्यावसायिकांचे फावते. शिर्डीत वाढत्या चोऱ्या बरोबरच धुमस्टाईलने दागिने ओरबाडने, पाकिटमारी, मोटार सायकल चोरी या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असून पोलिस आधिकारी या गुन्ह्यांची उकल करण्यात अपयशी ठरत असल्याने गुन्हेगारांचे उद्योग वाढत आहेत.
वीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शिर्डी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शिर्डी शहर व परिसरात कोम्बिंगऑपरेशन राबवून २० लोकांना ताब्यात घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र खरे गुन्हेगार मोकाटच फिरत असून  पोलिसांना त्यांना पकडण्यात अपयश येत आहे.