अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलानेच अत्याचार करून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नेर (ता. खटाव) येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. चिमुरडीचा मृतदेह विहिरीत टाकण्यासाठी संशयिताला एका महिलेने मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.

क्रांती विजय शिर्के (वय ८) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ही मुलगी २१ रोजी तिच्या घराच्या अंगणातून खेळताना बेपत्ता झाली होती. आज सकाळी तिचा मृतदेह गावालगतच्या मळा नावाच्या शिवारातील विहिरीत आढळून आले. लैंगिक अत्याचार करून क्रांतीचा खून करण्यात आल्याच्या संशयावरून या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. पुसेगाव पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल  झाला आहे. याबाबत सुरुवातीला अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल दाखल झाला होता. या मुलीच्या तपासासाठी नेर गावकऱ्यांनी सारा परिसर पिंजून काढला. पहाटे पाच वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. शिवाय दोन दिवस पोलिसांनी श्वान पथकाच्या साह्यने शोध घेण्यात आला. परंतु तिचा शोध लागला नाही. सकाळी गावालगत असलेल्या मळा नावाच्या शिवारातील विहिरीत क्रांतीचा मृतदेह आढळून आले. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह अधिक तपासणीसाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. मुंबई येथून ‘फॉरेन्सिक एक्स्पर्ट’ पथकाद्वारे सातारा येथे येऊन तपासणी झाल्यानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक अत्याचार करून मुलीचा खून करणे, पुरावा नष्ट करणे, लहान मुलांचा लैंगिक छळ (पोक्सो) आदी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

दरम्यान घटनास्थळाला अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बनसोड, कोरेगाव उपविभागातच्या पोलिस उपअधिकारी प्रेरणा कट्टे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. हा गुन्हा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पुसेगाव पोलिसांनी संयुक्त तपास करत उघडकीस आणला.