गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड आंदोलन करणारे संभाजी ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तोफखाना पोलिसांपुढे हजर होण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी आले खरे, मात्र त्यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आणखी एक वेगळा गुन्हा दाखल करून १३ जणांना अटक केली. त्यानंतर तोफखाना पोलिसांच्या ताब्यात त्यांना तपासासाठी देण्यात आले. हजर झालेले काही कार्यकर्ते शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील आहेत, याबद्दल चर्चा होत आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यास विरोध दर्शवण्यासाठी गेल्या मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या नगरच्या सावेडी भागातील संपर्क कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. केवळ मनोज कोंडके व संपत नागरगोजे या दोघांनाच तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. दोघांचीही काल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. भूमिगत झालेले संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी कार्यकर्ते शुक्रवारी पोलिसांसमोर हजर होतील, असे जाहीर केले होते.
शुक्रवारी सकाळी बसस्थानक चौकात परकाळे व इतर कार्यकर्ते आले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी १३ जणांना अटक केली. परकाळे यांच्यासह श्रीकृष्ण उर्फ आदिनाथ सावंत (जामखेड), गणेश गायकवाड (नगर), मयूर पवार (नगर), संजय वाघ (शेवगाव), आकाश बोऱ्हाडे (नगर), राजेश्वर चव्हाण (जामखेड), कैलास वाडकर (नगर), कानिफनाथ जपकर (नगर), सादाम सोरमिया सय्यद (नगर), दत्तात्रेय साठे (नगर), राहुल नवले (कर्जत), अरविंद गेरंगे (नगर) अशी त्यांची नावे आहेत. कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची कोतवाली पोलिसांनी जामिनावर सुटका केली व तोफखाना पोलिसांकडे शिंदे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याच्या गुन्हय़ात अटक केली. या सर्वाची एमआयडीसीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांना उद्या, शनिवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.