छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक व माजी महापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह ६० जणांना मंगळवारी अहमदनगर शहरात प्रवेशबंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील तोफखाना पोलिसांनी ५०, तर कोतवाली पोलिसांनी १० जणांवर ही कारवाई केली आहे.

आज (मंगळवारी)  शिवाजी महाराजांची जयंती असून या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. शिवजयंती जिल्ह्यात उत्साहाने साजरी केली जाते. लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला. सण-उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदशर्नाखाली कोतवाली व तोफखाना पोलिसांनी एक दिवसाच्या मनाईचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते. यानुसार सोमवारी पोलिसांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.

भिंगार कॅम्प पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियमातील १०७ मधील तरतुदींनुसार १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने छिंदमवर कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, अहमदनगर शहरातील मुख्य मिरवणुकीला मंगळवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.