बडतर्फ पोलिसासह सहाजणांवर गुन्हा
घरच्या मंडळींचा विरोध झुगारून प्रियकराबरोबर मुंबईला पळून गेलेल्या तरुणीचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सहाजणांविरुध्द सोलापूरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा समावेश आहे.
राजश्री आकाश भोसले (वय २४, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बडतर्फ पोलीस शिपाई विष्णू मारूती भोसले याच्यासह युवराज कोंडिबा सरवदे, विनोद कोंडिबा सरवदे, किशोर ज्ञानेश्वर सरवदे, अनिल नारायण सरवदे व प्रभाकर शंकर भोसले यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. गेल्या २४ एप्रिल रोजी राजश्री हिचा खून झाला होता. परंतु एका निनावी पत्रामुळे दीड महिन्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा खुनाचा प्रकार उजेडात आला.
मृत राजश्री हिचा विवाह एका वर्षांपूर्वी आकाश सरवदे याजबरोबर झाला होता. परंतु तिचे ईश्वर मारूती भोसले याजबरोबर प्रेमसंबंध होते. विवाह झाल्यानंतर ती सासरी नांदण्यास तयार नव्हती. पुढे संधी साधून प्रियकर ईश्वर भोसले याच्यासोबत २८ मार्च २०१६ रोजी मुंबईला पळून गेली होती. मुंबईत ईश्वरच्या नातेवाईकाच्या घरी राहात असताना त्याची माहिती राजश्री हिच्या घरच्या मंडळींना मिळाली. तेव्हा राजश्री व तिचा पती आकाशच्या घरच्या मंडळींनी मुंबई गाठून राजश्री हिला ताब्यात घेतले व तिला गोड बोलून सोलापुरात परत आणले. सोलापुरात तिचा मामा विष्णू भोसले याच्या घरात तिला ठेवण्यात आले असता अखेर विष्णू भोसले याच्यासह इतरांनी तिचा खून केला व त्याचदिवशी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी ईश्वर याचे चुलते पांडुरंग विठ्ठल भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.