रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत फोटो काढण्यासाठी मेघडंबरीवर चढल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रितेश देशमुख, रवी जाधव आणि विश्वास पाटील यांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार महाड पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. वकील ह्रषीकेश जोशी यांनी ही ऑनलाइन तक्रार दाखल केली असून आता पोलीस यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, कांदबरीकार विश्वास पाटील आणि अन्य मंडळींनी रायगडाला भेट दिली.

रायगडावरील मचाणीवर असलेल्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत रितेश आणि रवी जाधवने सेल्फी काढला. तर दुसऱ्या फोटोत संपूर्ण टीम महाराजांचे सिंहासन आहे तेथील मचाणीवर चढून रांगेत बसल्याचे दिसत होते. हे छायाचित्र खुद्द रितेश देशमुखनेच ट्विटरवर शेअर केले होते. हे फोटो बघून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. ज्या चरणांवर सर्व शिवभक्त नतमस्तक होतात तेथे जाऊन फोटो काढण्याची काय गरज होती, असा संतप्त सवाल शिवप्रेमींकडून विचारला जात होता. टीका सुरु होताच रितेश देशमुखने या प्रकरणावरुन माफी देखील मागितली.

रितेशच्या माफीनाम्यानंतरही शिवप्रेमींमधील रोष कमी झालेला दिसत नाही. कर्जतमधील वकील ह्रषीकेश जोशी यांनी महाड पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. रितेश देशमुख, रवी जाधव आणि विश्वास पाटील या तिघांनी पुतळ्याजवळ बसून काढलेल्या फोटो राज्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हा सामाजिक भावना दुखावण्याचा प्रकार असून हे लोक मेघडंबरीपर्यंत कसे पोहोचले, याची चौकशी करणे गरजेचे आहे. हा प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट देखील असू शकतो. संबंधितांवर तसेच हे छायाचित्र काढणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.